मत्स्यव्यवसायच्या अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेऊ नये, प्रांत खरमाळे यांनी सुनावले ; नौकांमधून बाहेरील व्यक्ती येता नये…
मालवण, ता. १७ : मासळी लिलावाच्या ठिकाणी केवळ मासळी लिलाव घेणार्यांनाच प्रवेश दिला जाणार असून अन्य नागरिकांना लिलावाच्या ठिकाणी प्रवेश बंदी असेल. याची अंमलबजावणी येत्या २० तारखेपासून केली जाणार आहे असे प्रांत वंदना खरमाळे यांनी आज झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. मासेमारी हंगाम सुरू होणार असला तरी नौकांमधून परजिल्ह्यातील किंवा अन्य भागातून कोणतीही व्यक्ती येथे येणार नाही याची दक्षता संबंधित नौकामालकांची राहणार आहे. त्यामुळे कारवाई करण्याची वेळ आणू नका असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान लिलावाच्या ठिकाणी सातत्याने गर्दी होत असून मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी आपली जबाबदारी झटकत असल्याने मत्स्यव्यवसायच्या अधिकार्यांना प्रांत खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे यांनी चांगलेच सुनावले. त्यानुसार उद्यापासून मत्स्यव्यवसायचे अधिकार लिलावाच्या ठिकाणी दोन सत्रात उपस्थित राहतील असे सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी यावेळी स्पष्ट केले.
शहरात मासळी लिलावाच्या ठिकाणी सातत्याने गर्दी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी तहसील कार्यालयात संबंधित अधिकारी, मत्स्यसोयासट्यांचे प्रतिनिधी यांची बैठक प्रांत वंदना खरमाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, जे. डी. सावंत, तेजस्विता करंगुटकर, मुरारी भालेकर, मेघनाद धुरी, बाबी जोगी, योगेश मंडलिक, डेनिस नर्होंना, विकी चोपडेकर, सेलेस्तीन फर्नांडिस आदी उपस्थित होते.
सध्या मासळी मंडईनजीक होणार्या लिलावाच्या ठिकाणी गर्दी होत असून मत्स्य व्यवसाय विभागाकडून गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाने आपली जबाबदारी झटकू नये. याठिकाणी पोलिस व पालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित असताना मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी पुढे येत नाही. त्यांच्याकडून केवळ बघ्याची भुमिका घेतली जाते ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकार्यांनी पुढाकार घेत लिलावाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना प्रांत खरमाळे यांनी केल्या.
लिलावाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी पालिका व पोलिस प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळत आहे. मात्र मत्स्यव्यवसायच्या महिला अधिकारी तेथे जात असून त्यांना कोणी ऐकत नाहीत. त्यामुळे मत्स्यव्यवसायच्या अधिकार्यांनी जरा कडक भूमिका घेणे महत्त्वाचे असल्याचे बाबी जोगी यांनी सांगितले. यावेळी तालुक्याच्या किनारपट्टी भागातून येणार्या मच्छीमारांना पासेस देण्यात यावेत अशी मागणी श्री. धुरी यांनी केली. त्यानुसार सोसायट्यांकडून यादी घेऊन पासेस दिले जातील असे प्रशासनाने स्पष्ट केले.
लिलावाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी केवळ मोठ्या खरेदीदारांनाच लिलावाच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. अन्य नागरिकांना तेथे प्रवेश बंदी असेल. जे कोणी ऐकत नसतील त्यांच्या विरोधात मत्स्यव्यवसायच्या अधिकार्यांनी पोलिसांत तक्रार द्यावी अशा सूचना प्रांत खरमाळे यांनी केल्या. नौकांवरील खलाशांनी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. सॅनीटायझरचा वापर त्यांनी करावा. एखाद्या खलाशाला खोकला, सर्दी असेल तर त्याची तत्काळ आरोग्य तपासणी करून घ्यायची आहे. त्याचबरोबर मासेमारी सुरू झाल्यानंतर नौकांमधून अन्य भागातून कोणीही व्यक्ती येथे येणार नाही याची काळजी नौकामालकांनी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी केल्या.