अलगीकरण कालावधीतील सर्वेक्षण आता २८ दिवसांचे…

141
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी, ता.१७: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परदेश,परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना घरीच अलगीकरणात ठेवण्यात येते.तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनाही अलगीकरणात ठेवण्यात येते.या अलगीकरण काळात १४ दिवसांपर्यंत या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येत होते. आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत हे सर्वेक्षण करण्यात येते. आता सदरचे सर्वेक्षण हे २८ दिवस करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.

हे सर्वेक्षण अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर पुढील सलग 14 दिवस करण्यात येणार आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात 52 व्यक्ती दाखल आहेत. आजपर्यंत 154 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 106 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. उर्वरीत 48 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्ह्यात आजमितीस 390 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून 52 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 28 दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 213 आहे.
कोविड – 19 रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालयाच्या पथकातर्फे जिल्ह्यातील 7 वृद्धाश्रमांची तपासणी करण्यात आली. एकूण 372 रुग्णांची तपासणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच आश्रमातील वृद्धांची रक्तदाब, मधुमेह तपासणी करुन दोन महिन्यांच्या औषधांचा पुरवठा करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील 6 निवारा केंद्रांची तपासणीही या पथकामार्फत करण्यात आली. त्यामध्ये 101 व्यक्तींची तपासणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. जिल्ह्यातील ओरोस व सावंतवाडी येथील कारागृहातील कैद्यांची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत  करण्यात आली.  ओरोस येथील 66 कैद्यांची तपासणी केली. त्यातील 10 कैद्यांना असलेल्या किरकोळ आजारांवर औषधोपचार करण्यात आले. तर सावंतवाडी येथील कारागृहातील 60 कैद्यांची तपासणी करून त्यापैकी किरकोळ आजार असलेल्या 17 कैद्यांवर औषधोपचार करण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सध्या जिल्हा रुग्णालयामार्फत 7 डायलेसिसचे व 1 केमोथेरपीचे रुग्ण सेवा घेत आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज 2119 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.