Tuesday, January 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करुनच शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी...

कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करुनच शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी…

अजित पवार; टाळेबंदी राहणारच,परंतु टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार…

मुंबई ता.१८ : राज्यात टाळेबंदीचे काटेकोर पालन यापुढेही सुरु राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. सोमवार दिनांक २० एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत ३ मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत.

देशात जाहीर टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काल मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नागरिकांनी त्याचं काटेकोर पालन करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

मार्गदर्शक नियमावलीनुसार ग्रामीण भागातील उद्योग, निवडक व्यवसाय, व्यापारी आस्थापनांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर परवानगी देण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यात टाळेबंदीची मुदत वाढवण्यात आली असली तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यापुढेही नियमित सुरु राहील, त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. शिवाय नागरिकांना, कोरोना प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबावं, घराबाहेर पडू नये, सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

टाळेबंदीसंदर्भात केंद्राच्या सूचनांचे राज्यात काटेकोर पालन करण्यात येत आहे. टाळेबंदी लागू असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी आहे. दवाखाने, हॉस्पिटल, औषधांची दुकाने, पॅथोलॉजी सेंटर, ॲम्बुलन्स सेवा सुरु आहेत. शेतीच्या मशागतीच्या कामांवरही कोणतेही बंधन नाही. शेती आणि शेती उद्योगाशी संबंधित सर्व कामे, दुकाने, व्यवहार सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तूर, कापूस, हरभरा खरेदी योजना देखील सुरु राहणार आहे. दूधव्यवसाय, पशुपालन, मत्स्योद्योगविषयक कामांनाही परवानगी आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरु राहणार आहेत. अनाथालये, वृद्धाश्रम आदी सामाजिक संस्थांचे कामकाजही सुरु राहील. अंगणवाड्या बंद असल्या तरी बालकांना पोषण आहार घरपोच दिला जाणार आहे. शाळा, कॉलेज बंद असली तरी ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आले आहे. बँका, वित्तीय संस्थांचे व्यवहार सुरु राहणार असले तरी नागरिकांनी तिथे गर्दी करु नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

राज्यातील कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी टाळेबंदीला सर्वांनी सहकार्य करावे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये अंतर राखावे, घरातूनच काम करा, घरातच रहा, सुरक्षित रहा, टाळेबंदीचे पालन करा असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments