स्थानिकांमध्ये घबराट; ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून परिसरात डस्टींग
बांदा ता.१८: पाडलोस-केणीवाडा येथे वस्तीलगत असलेल्या आंबा व काजू बागायतीत माकड मृतावस्थेत आढळून आल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी सुनिल परब यांनी त्या माकडाला दहन केले. आज सकाळी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन डस्टिंग केल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
केणीवाडा येथील आंबा बागायतदार सुनिल दशरथ परब हे काल संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास बागेत फेरफटका मारताना त्यांना मृतावस्थेत एक माकड दिसून आले. त्यांनी याची खबर ग्रामस्थ अमोल नाईक व पाडलोस सरपंच यांना दिली. सुनिल परब यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्या माकडाला दहन केले.
आरोग्यसेवक बापू कांबळी यांनी आज सकाळी घटनास्थळी येऊन पाहणी केली. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी औषध फवारणी केल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी ग्रामस्थ राजू शेटकर व सुनील परब उपस्थित होते. गावात अशी घटना घडल्यास तात्काळ ग्रामपंचायतला कळवा जेणेकरून त्याचक्षणी उपाययोजना करता येईल असे आवाहन सरपंच अक्षरा पाडलोसकर यांनी केले आहे.