उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर ; अनेक गावांत तलाठ्यांकडून अपेक्षित काम नाही- सभापती पाताडे…
मालवण, ता. १८ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील केंद्रचालकांनीही चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणे आवश्यक असल्याचे मत तालुक्यातील सरपंचांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मांडले. या पार्श्वभूमीवर केंद्रचालकांना प्रशासनाकडून प्रोत्साहनपर अनुदान देणे विचाराधीन असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागात स्वयंसेवकांनीही चांगले काम केल्याने त्यांनाही गौरविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान ग्रामपंचायतींकडून एकीकडे चांगले काम केले जात असताना अनेक गावांमध्ये तलाठ्यांकडून अपेक्षित काम केले जात नसल्याचे दिसून आल्याचे सभापती अजिंक्य पाताडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
पंचायत समितीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या. यात गावागावात सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांच्यासह अन्य सदस्यांनाही ग्रामपंचायतींना भेटी देत आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना देत त्याचा आढावाही घेतला. घरोघरी मास्क, सॅनीटायझर, गरजूंना धान्य उपलब्ध करून देणे यासाठीही आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली.
ग्रामपंचायतींच्या कामकाजात केंद्रचालक म्हणजेच डाटा ऑपरेटर्स यांचेही मोठे योगदान राहिले आहे. दैनंदिन अहवाल तसेच अन्य अत्यावश्यक सेवा त्यांनी तत्पर उपलब्ध करून देत चांगले कामकाज केले आहे. त्यामुळे त्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे अशी भूमिका अनेक सरपंचांनी आजच्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मांडली. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून केंद्र चालकांना प्रोत्साहनपर अनुदान देणे विचाराधीन असल्याचे स्पष्ट करण्यात आले. घरपोच सुविधा देण्याबरोबरच अन्य सुविधा देण्यासाठी स्वयंसेवकांनीही चांगले काम या काळात केले आहे. त्यामुळे अशा सर्व स्वयंसेवकांचाही गौरव केला जाईल असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पराडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.