सरमळे ग्रामस्थांनी वेधले लक्ष;संबंधितांचा बंदोबस्त करण्याची केली मागणी…
सावंतवाडी.ता,१९: लॉकडाऊनच्या काळात काही लोकांकडून नदी पात्रावर अवैद्य मासेमारी तसेच पार्ट्या केल्या जात असल्याचा प्रकार तालुक्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नांगरतासवाडी व नेवली परिसरात असलेल्या नदी पात्रावर होणा-या पार्ट्या व मासेमारी रोखावी अशी मागणी तेथिल ग्रामस्थांनी सरपंचांकडे केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटल्याप्रमाणे, नांगरतासवाडी-नेवली परिसरातील नदीपात्रात पंचक्रोशीतील व बाहेरील लोक मोठ्या प्रमाणात मासेमारी करीत आहेत.त्यासाठी ते अनुचित प्रकारांचा वापर करीत आहेत.यात नदीच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकून मासेमारी करणे, आदींसारख्या प्रकारांचा वापर करून ही मासेमारी सुरू आहे.तर याठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्या सुद्धा रंगत आहेत.त्यामुळे परिसरात दारूच्या बाटल्यांचे साम्राज्य पसरले आहे. तर नदीपात्रात सुद्धा हा गाळ जमा झाला आहे.या नदीचे पाणी गावातील लोक पिण्यासाठी वापरतात,मात्र असे दूषित पाणी पिल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो,त्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.