मुख्यमंत्र्यांची घोषणा ;उद्योग चालू केले तरी,जिल्हा सीमा बंदी कायम
मुंबई.ता,१९: ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योगांची सुरुवात करण्यात येईल,उद्यापासून याचा श्री.गणेशा केला जाईल.मात्र जिल्हा सीमा बंद ठेवण्यात येतील.आतापर्यंत सहकार्य केलात,यापुढेही सहकार्य करा असे भावनिक आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.अद्याप पर्यंत कोरोनावर औषध मिळालेले नाही. त्यामुळे घरात राहणे योग्य आहे.त्यामुळे कोणीही आजाराबाबत गाफील राहू नये. घरात राहून स्वतःची काळजी घ्या,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना श्री.ठाकरे पुढे म्हणाले, लॉकडाऊन काळात राज्याचे अर्थचक्र कोलमडले आहे. त्यामुळे राज्यावर आर्थिक संकट येऊ नये, यासाठी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये असलेल्या भागात उद्योग व्यापाराला परवानगी देण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले, कोरोनाच्या काळात कोणीही गाफील राहू नये, सर्दी,खोकला,ताप आदी लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घ्यावेत. कारण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर जेवढे लवकर उपचार केले जातात, तेवढे ते लवकर बरे होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, कोरोना रुग्णांना समाज वाळीट टाकेल, या विचारांनी घाबरून जाऊ नये, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही आहे. त्यामुळे येथील नागरिक तसे वागणार नाही, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.