वेंगुर्लेतील घटना; मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी त्वरित घेतली दखल…
वेंगुर्ला ता.१९; शहरात कोव्हिड-१९च्या सर्वेक्षणादरम्यान ३० परप्रांतिय लहान मुलांसहीत अन्नधान्याविना वंचित राहिल्याचे आढळून आल्याने सर्वेक्षणकर्त्यांनी याची त्वरित माहिती मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना देत अगदी काही मिनिटातच त्यांना अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यात आले.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरातही घरोघरी कोव्हिड-१९बाबत सर्वेक्षण सुरु आहे. शहरातील सातेरी मंदिर परिसर नजिक शनिवार १८ एप्रिल रोजी सुरु असलेल्या सर्वेक्षणादरम्यान येथील एका चाळीत ३० परप्रांतिय अन्नधान्याविना वंचित राहिल्याचे आढळून आले. सदरचे परप्रांतिय हे शहरात मुकादमाविना आपण स्वतःच मोलमजुरीची कामे करतात. त्यामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. याठिकाणी सर्वेक्षणाच्या कामगिरीवर असलेले नगरपरिषद कर्मचारी विठ्ठल सोकटे व अंगणवाडी सेविका नयना आरेकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी त्वरित मुख्याधिकारी वैभव साबळे व नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती दिली. सदरची माहिती मिळताच मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी अगदी अल्पवेळेत या परप्रांतियांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन दिले.