वेंगुर्ले-नाभिक बांधवांकडून तहसीलदारांना निवेदन; मदतीसाठी केले आवाहन…
वेंगुर्ला.ता.१९ :
लॉकडाऊन कालावधित वेंगुर्ला तालुक्यातील संपूर्ण सलुन व्यावसायीकांनी दुकाने बंद ठेऊन शासनाला सहकार्य केलेले आहे. मात्र, वाढत्या लॉकडाऊनमुळे आमच्यावर उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे आपत्कालीन आर्थिक मदत योजनेतून काही आर्थिक मदत नाभिक बांधवांना मिळावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ मुंबई शाखा वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने वेंगुर्ला तहसिलदार यांना देण्यात आले.
नाभिक बांधवांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बारा बलुतेदारांपैकी एक असलेला आमचा पारंपारिक नाभिक व्यावसायीक हातावरचे पोट असलेला उदरनिर्वाह करणारा बलुतेदार आहे. २१ मार्चपासून आजपर्यंत लॉकडाऊन कालावधित तालुक्यातील संपूर्ण सलुन व्यावसायीकांनी आपली दुकाने बंद ठेऊन शासनाला सहकार्य केलेले आहे. कोविड-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी समस्त नाभिक व्यावसयीकांनी दुकाने बंद ठेऊन घरी थांबले आहेत. मात्र, सतत वाढणाऱ्या लॉकडाऊनमुळे उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. कायद्याचे काटेकोरपणे पालन करीत आमचे सर्व बांधव घरी बसून सलून दुकाने उघडायची परवानगी मिळण्याची वाट पाहत बसलेला आहे. तरी आपत्कालीन आर्थिक मदत योजनेतून काही आर्थिक मदत आमच्या नाभिक बांधवांना रोख स्वरुपात नुकसान भरपाई मिळावी असे या निवेदनात नमुद केले आहे.
वेंगुर्ला तहसिलदार प्रविण लोकरे यांना निवेदन सादर करतेवेळी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ मुंबई शाखा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष किरण पवार, सदस्य विश्वास पवार आणि विनोद चव्हाण आदी उपस्थित होते.