बागायतींचे लाखोंचे नुकसान; बंदोबस्त करण्याची वनविभागाकडे मागणी…
बांदा.ता.19ःलाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या बागायतीचे रानटी प्राण्यांकडून नुकसान होत असल्याने पाडलोस-केणीवाडा येथील शेती बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. प्रेमानंद साळगावकर यांच्या बागेतील नारळ, सुपारी, काजू, जांभूळ व दालचिनी झाडे गव्यारेड्यानी जमिनदोस्त केली असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पाडलोस क्षेत्रात गव्यांचा वावर नेहमीच सुरू असतो. सद्यस्थितीत पाडलोसमधील सुमारे शेकडो एकर जमीन आज गवा रेड्यांच्या उपद्रवामुळे पडीक ठेवण्यात आली आहे. सध्या काजूचा हंगाम असल्याने शेतकरी दिवसभस बागेत वावरत असतात. आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास दोन गव्यांची अचानक झुंज लागल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. यावेळी उत्पन्न देणारी नारळाची चार वर्षांची दोन झाडे, सुपारी दहा, काजूची २५, जांभूळ सहा व मसाल्यासाठी वापरण्यात येणारे एक दालचिनी झाडांची गव्यांनी मुळासकट उखडून टाकली.