के.मंजूलक्ष्मी; काम करताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक…
सिंधुदुर्गनगरी,ता.१९: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने केंद्र सरकाराने ३ मे पर्यंत दुसरे लॉकडाऊन घोषित केले आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना सर्व सरकारी विभागांना दिल्या आहेत.त्यामध्ये सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता १० टक्के राहणार आहे.तसेच शासकीय कामांना परवानगी देण्यात येणार आहे. २० एप्रिल नंतर काही प्रमाणात महत्वाच्या कामांना सुरुवात होणार आहे. त्यामध्ये रस्ते, पूल यांची बांधकामे यांचा समावेश मुख्यतः असणार आहे. तसेच नागरी भागातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. तर ग्रामिण भागात पावसाळ्या पूर्वी पूर्ण होणे गरजेची असलेली कामे सुरू करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत. सर्व कर्मचारी, कामगार यांनी मास्क वापरावेत, काम करातना पुरेसे समाजिक अंतर ठेवावे, वेळोवेळी हॅन्डवॉश, सॅनिटायजरचा वापर करून हात स्वच्छ करावेत, कामावरील कामगारांचा इतर नागरिकांशी संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी, कामाच्या ठिकाणी जिल्ह्यातील कामगारांचा वापर करण्यात यावा, कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या कामगारांचा वापर करण्यात येऊ नये, कोरोनाची लागण झाल्याची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय तपासणी करावी, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर व मास्क पुरशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात यावे, कामाच्या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवावा, कामाच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळून, कमिक कमी कर्मचारी, कामगारांसह काम हाताळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये 46 व्यक्ती दाखल असून आजपर्यंत एकूण 166 नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 144 नमुन्यांचा आहवाल प्राप्त झाला असून 22 नमुन्यांचा आहवाल येणे बाकी आहे. जिल्ह्यात आजमितीस 377 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून संस्थात्मक अलगीकरण कक्षामध्ये 69 व्यक्ती आहेत. 28 दिवसांचे अलगीकरण कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 246 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयामार्फत थालसेमिआचे 10 रुग्ण, डायलेसिसचे 23 आणि केमो थेरपीचे 1 रुग्ण यांना नियमित सेवा देण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील कारागृहातील कैद्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये ओरोस येथील 66 कैद्यांची तपासणी करून त्यातील 10 कैद्यांवर किरकोळ आजारासंबंधी उपचार करण्यात आले. तर सावंतवाडी येथील 60 कैद्यांची तपासणी करून त्यापैकी 17 कैद्यांना किरकोळ आजारावरील उपचार करण्यात आले. जिल्ह्यातील 7 वृद्धाश्रमातील 372 व्यक्तींची तपासणी करून त्यांना रक्तदाब, मधुमेहाच्या औषधांचा पुढील दोन महिन्यांचा साठा देण्यात आला आहे. तसेच निवारा केंद्रातील व्यक्तींची वैद्यकीय पथकाद्वारे तपासणी कऱण्यात आली. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत आज 457 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.