रिक्षा जप्त ; मसुरे पोलिसांची कारवाई…
मालवण, ता. १९ : लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरीतून तालुक्यातील चुनवरे गावात आलेल्या एका युवकासह त्याचा भाऊ व अन्य एक अशा तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात प्रवासासाठी वापरलेली एक रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.
संबंधित युवक हा रत्नागिरी येथे वाहन चालक म्हणून कामास आहे. २० मार्चला तो रत्नागिरीत गेला होता. २२ रोजी तो रत्नागिरी येथून परतणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे तो तेथेच अडकला. १६ एप्रिलला पहाटे साडे चार वाजता तो रत्नागिरीतून सागरी महामार्गाने गावी यायला निघाला. यात आंबेरी पोलिस तपासणी नाका येण्यापूर्वी तो आडवाटेने जंगलातून तपासणी नाके चुकवत जिल्ह्याच्या हद्दीत दाखल झाला. येण्यापूर्वीच त्याने गावी फोन करत भाऊ व अन्य एकास आंबेरी येथे बोलविले होते. रिक्षातून हे तिघेही रात्री साडे आठ वाजता चुनवरे गावठण वाडी येथे आले.
आरोग्यविभागाला याची माहिती मिळताच १७ रोजी त्याला ओरोस जिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी नेण्यात आले. पोलिस पाटील महेश परब यांनी याबाबत माहिती दिल्यावर मसुरे पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी प्रमोद नाईक, विवेक फरांदे, हरिश्चंद्र जायभाय यांनी चुनवरे येथे जात त्या युवकासह अन्य दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी तिघांवरही साथरोग प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद नाईक, विवेक फरांदे, हरिश्चंद्र जायभाय करत आहेत.