राजन तेली;सावंतवाडीत परवा पासुन “कमळ थाळी”सुरू…
सावंतवाडी ता.२०: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर करावा,अशी मागणी जिल्हा प्रशासनासह मुख्यमंत्र्यांकडे केली आहे,अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान येत्या दोन दिवसात सावंतवाडी शहरात सुध्दा मोफत “कमळ थाळी” सुरू करण्यात येणार आहे.त्याचा गरजूनी लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक सुधीर आडिवरेकर,समृद्धी विरनोडकर,दीपाली भालेकर,,मनोज नाईक,आनंद नेवगी,राजू बेग,उत्कर्षा सासोलकर आदी उपस्थित होते.
श्री तेली पुढे म्हणाले,शहरात सुरु होणारी पहिल्या दिवसाची कमळ थाळी नगर सेवक सुधीर आडिवरेकर यांच्याकडून दिली जाणार आहे. व त्यानंतर लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम याठिकाणी सुरू राहणार आहे.
ते पुढे म्हणाले एकही व्यक्ती लॉकडाऊन काळात उपाशी राहता कामा नये,अशा सूचना आम्हाला केंद्र शासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात २ एप्रिल पासून १९ एप्रिल पर्यंत २५,६१३ लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर ७६,३१८ सॅनिटायझर-मास्कचे वाटप करण्यात आले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३७८ गावात भाजपच्या माध्यमातून जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. तर पंतप्रधान फंडासाठी जिल्ह्यातील १९९० लोकांनी मदतनिधी दिला आहे,असेही त्यांनी सांगितले.