रहिवाशी संघ साई मंदिर संस्थेकडून तहसीलदारांना धनादेश सुपूर्द…
मालवण, ता. २० : शहरातील धुरीवाडा येथील रहिवाशी संघ साईमंदिर, साईनगर यांच्यावतीने पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रत्येकी ११ हजार अशी एकूण २२ हजार रुपयांची आर्थिक मदत धनादेशाद्वारे आज तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात गेली 34 वर्षे योगदान देणार्या या संस्थेच्या वतीने कोरोना (कोविड 19) या आपत्ती काळात सामाजिक भावनेतून शासनास मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. या संकटसमयी आणि यानंतरही काही सहकार्य लागल्यास रहिवाशी संघ साईमंदिर, साईनगर संस्था प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करेल असे लेखी पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी संस्थाध्यक्ष जगन्नाथ तळाशिलकर, उपाध्यक्ष महेश सारंग, सरचिटणीस राजू बिडये, नीलेश तळाशिलकर, आनंद तळाशिलकर आदी उपस्थित होते.