मिरज येथे पाठविलेल्या १७५ पैकी १५ नमुन्यांचा अहवाल बाकी…
सिंधुदुर्गनगरी,ता.२०: जिल्हा रुग्णालयाने मिरज येथे तपासणीसाठी पाठविलेल्या १७५ नमुन्यांपैकी १६० नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे.तर अजून १५ नमुन्यांचा अहवाल बाकी आहे.विलगीकरण कक्षामध्ये आजमितीस ४१ व्यक्ती दाखल आहेत.जिल्ह्यात आजपर्यंत ३९९ व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून संस्थात्मक अलगीकरण कक्षामध्ये ७२ व्यक्तींना ठेवण्यात आले आहे.तर २८ दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी संपलेल्या व्यक्तींची संख्या २४७ इतकी आहे.
लॉकडाऊनच्या काळात जिल्हा रुग्णालयामार्फत 10 थालासेमिआ, 29 डायलेसिस आणि 1 केमथेरपीच्या रुग्णास सेवा देण्यात येत आहे. कैदी, वृद्धाश्रम, मजूर कॅम्प या ठिकाणी असलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले असून या पथकामार्फत नियमित पणे या ठिकाणी असलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत आज 1990 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, बेघर व कामगार यांच्यासाठी जिल्ह्यात 10 कॅम्प उभारण्यात आले आहेत. जिल्हा भरातील या कॅम्पमध्ये सध्या 200 व्यक्तींच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. तसेच महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत अलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींचे सामुपदेशन करण्यात येत आहे. त्यासाठी तालुकानिहाय सामुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 64 ठिकाणी अलगीकरण करण्यात आलेल्या 735 व्यक्तींचे सामुपदेशन करण्यात आले आहे.
आंब्याच्या वाहतुकीसाठी कृषि अधिक्षक कार्यालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आज अखेर पर्यंत जिल्ह्यातून कृषि विभागाच्या माध्यमातून 1 हजार 935 मे.टन आंबा राज्याच्या विविध भागात विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे.
संचारबंदीमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक, अत्यावश्यक सेवा वाहतूक सुरूच राहणार आहे. काही महत्वाच्या कामांना सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पण, ही कामे करताना घालून दिलेले नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.