अशोक सावंतांचा आरोप; राऊतांच्या संपर्कात आलेल्यांना होम क्वारंटाइन करण्याची मागणी…
मालवण, ता. २१ : जिल्हा लॉकडाऊन असतानाही खासदार विनायक राऊत हे मुंबईतून ६ गाड्यांचा ताफा घेऊन जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व गाड्या १८ एप्रिलच्या रात्री खासदारांच्या तळगाव निवासस्थानी दाखल होऊन त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मार्गस्थ झाल्या. मुंबईतून आल्यानंतर किमान ५ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचे शासनाचे निर्देश असताना त्याचा भंग करून खास. राऊत यांचा दुसऱ्या दिवसापासून जिल्ह्यात मुक्तसंचार सुरू आहे. त्यामुळे खास. राऊत यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाइन करा, तसेच खासदारांसमवेत मुंबईतून आलेल्या अन्य वाहनांचाही शोध घेण्याची मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी केली आहे.
लोकप्रतिनिधींनी मुंबईतून जिल्ह्यात गेल्यानंतर ५ दिवस होम क्वारंटाइन राहिल्यानंतरच जिल्ह्यातील बैठकांमध्ये सहभागी होण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र खासदार विनायक राऊत हे १८ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तळगाव येथील निवासस्थानी दाखल झाल्यानंतर होम क्वारंटाइनचे निर्देश मोडून १९ रोजी सकाळ पासूनच जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात बैठका घेत फिरत आहेत. १९ रोजी सकाळी त्यांनी मालवण पालिकेत शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सोबत आढावा बैठक घेतली. तसेच त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी बैठका, पत्रकार परिषदा घेतल्या. शिवाय त्यांच्यासोबत मुंबईतून गावात येताना मुंबई पासिंगच्या सहा गाड्या होत्या. या गाड्या त्यांना गावात सोडून अन्यत्र रवाना झाल्या. त्या गाड्या कोणाच्या होत्या ? त्या गाड्यांतून येणाऱ्यांनी परवानगी घेतली होती का ? त्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले आहे का ? याची तपासणी करावी, अशी मागणी श्री. सावंत यांनी केली आहे.
आमदार नीतेश राणे सोमवारी मुंबईतून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मात्र शासकीय निर्देशानुसार जनतेच्या हितासाठी त्यांनी पाच दिवसांसाठी स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. त्यानंतर ते जिल्ह्यात आणि मतदार संघात भेटीगाठी घेऊन आढावा घेणार आहेत. पण १८ रोजी जिल्ह्यात आलेल्या खास. विनायक राऊत यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी स्वतः ला होम क्वारंटाइन करून न घेता वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या. त्यामुळे खासदारांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना होम क्वारंटाइन करावे, हा जिल्हा आजपर्यंत कोरोनामुक्त ठेवण्यात प्रशासकीय अधिकारी आणि जनतेने यश मिळवले आहे. पण मुंबईसारख्या कोरोनाच्या हॉटस्पॉट वरून जिल्ह्यात आलेल्या खासदारांच्या बेफिकीरपणामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. त्यामुळे याची शासन आणि प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी श्री. सावंत यांनी केली आहे.