Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याअवैधरित्या मासेमारी करणारा गोव्यातील एलईडी ट्रॉलर पकडला...

अवैधरित्या मासेमारी करणारा गोव्यातील एलईडी ट्रॉलर पकडला…

मत्स्यव्यवसायच्या गस्तीनौकेची कारवाई…

मालवण, ता. २१ : जिल्ह्याच्या सागरी हद्दीत २५ वावात एलईडीच्या साहाय्याने अवैधरीत्या मासेमारी करणारा गोव्यातील एक ट्रॉलर आज पहाटे चार वाजता मत्स्य व्यवसायच्या गस्तीनौकेने पकडण्याची कारवाई केली आहे. संबंधित ट्रॉलरवर कारवाईसाठी तहसीलदारांकडे प्रतिवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली.
एलईडी, पर्ससीननेटच्या मासेमारीस बंदी असतानाही येथील समुद्रात सध्या परराज्यातील एलईडी धारकांनी घुसखोरी करत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. याबाबत सातत्याने आवाज उठवूनही मत्स्य व्यवसाय विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने पारंपरिक मच्छीमारांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. यात आज पहाटे मत्स्य व्यवसाय विभागाची गस्त सुरू असताना २५ वाव समुद्रात एक ट्रॉलर एलईडीच्या साहाय्याने अवैधरीत्या मासेमारी करत असल्याचे आढळून आले. त्यानुसार गस्तीनौकेवरील मत्स्य परवाना अधिकारी मुरारी भालेकर, पोलिस कर्मचारी सिद्धेश चिपकर, अमित हरमलकर यांनी हा ट्रॉलर पकडला. ट्रॉलरवरील कागदपत्रांची तपासणी केली असता गोवा येथील पेस्काडोर ३ नावाचा श्रीमती माधुरी हलरणकर यांच्या मालकीचा हा ट्रॉलर असल्याचे दिसून आले. या ट्रॉलरवर एलईडी दिवे आढळून आले. त्यानुसार हा ट्रॉलर जप्त करून येथील बंदरात आणून अवरुद्ध करण्यात आला आहे. सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त ना. वि. भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
संबंधित ट्रॉलरवर कारवाईसाठी तहसीलदारांकडे प्रतिवेदन सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. सध्या कोरोनामुळे पोलिस यंत्रणेवर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीतही कारवाईसाठी पोलिस प्रशासनाने पोलिस कर्मचारी उपलब्ध करून दिल्याबद्दल परवाना अधिकार्‍यांनी पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांचे आभार मानले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असतानाही मत्स्य व्यवसाय विभागाने केलेल्या या कारवाईबाबत पशू, दुग्ध, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव यांनी अभिनंदन केले आहे. अवैधरीत्या मासेमारी करणार्‍या परराज्यातील ट्रॉलर्सधारकांवर यापुढेही कडक कारवाई केली जाणार असल्याचे मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments