तहसीलदारांकडे २२ हजार पाचशे रूपयांचा धनादेश सुपुर्द…
मालवण, ता. २१ : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दांडीच्या माजी विद्यार्थीनी तसेच दांडी व वायरी येथील स्थानिक गृहीणी यांनी कोरोनाग्रस्तांसाठी निधी संकलन करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २२ हजार पाचशे रूपयांचा धनादेश तहसीलदार अजय पाटणे यांना आज सुपूर्द केला.
जगभर कोरोना विषाणुने मानवजातीवर महाभयानक संकट निर्माण केले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी समाजाच्या विविध स्तरातून मदतीचा हात पुढे येत आहे. दांडी व वायरी येथील रसिका मांजरेकर, स्वप्नाली सारंग, रश्मी खवणेकर, वैष्णवी मालंडकर, मेघा खराडे, निकिता केळुसकर, दर्शना सादये, हर्षल कुमठेकर, मृणाल कोयंडे, नेहा केळुसकर, सायली मोंडकर, कविता मोंडकर आदींनी आपआपल्या वाडीतील महिलांशी संपर्क साधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पुढाकार घेतला. सामाजिक अंतरचे नियम पाळत जवळपास दोनशे महिलांनी या मदतनिधीस हातभार लावला.
दांडी येथील दांडी आवारवाडी, बाल दांडेश्वरवाडी, श्रीकृष्णवाडी, झालझुलवाडी, मोरेश्वरवाडी तर वायरी येथील शिवजयंती उत्सववाडी येथे निधी संकलन अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचे तहसीलदार अजय पाटणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी कौतुक केले. निधी संकलनासाठी दांडी शाळा १११ स्थापना वर्ष उत्सव समितीनेही सहकार्य केले.