मालवण पालिकेची कारवाई ; पोलिसांत तक्रार दाखल…
मालवण, ता. २१ : शहरात परजिल्ह्यातील भाजीपाला व फळ विक्रीवर बंदी घालण्यात आली असतानाही बाजारपेठेत बेकायदेशीरपणे परजिल्ह्यातील भाजीपाला विक्री केल्याप्रकरणी पालिका प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी बशीर शरपुद्दीन अथनीकर या भाजी विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पालिकेने परजिल्ह्यातील भाजीपाला व फळ विक्रीवर शनिवारपासून बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांत शिल्लक माल विक्री करण्याचे निर्देशही दिले होते. यामुळे बाजारपेठेत परजिल्ह्यातील भाजीपाला खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे काही भाजीविक्रेत्यांनी चांगलीच डबल दराने भाजी विक्री करत आपला फायदा करून घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र सोमवारपासून परजिल्ह्यातील भाजीपाला व फळ विक्रीवर पूर्णपणे बंदी घालत त्याची कडक अंमलबजावणी पालिका प्रशासनाकडून करण्यात आली. यात पालिकेने यासाठी आपल्या विभागातील कार्यरत अधिकारी वर्गाची नियुक्ती करत बाजारपेठेतील भाजी विक्रीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली.
बशीर अथनीकर याच्या गोडाऊनमध्ये भाजी विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या पथकाने थेट गोडाऊनमध्ये धडक देत सर्व भाजीपाला जप्त केला. या कारवाईत पालिकेचे अधिकारी सुधाकर पाटकर, जयसींग गावीत, आरोग्य निरीक्षक विजय खरात, मुकादम रमेश कोकरे, हेमंत वायंगणकर, गौरव सोनवडेकर, मंदार चव्हाण हे सहभागी झाले होते. याबाबत गावीत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
परजिल्ह्यातील भाजीपाला विक्रीवर बंदी असताना शहरातील काही सुशिक्षित नागरिक संबंधित भाजी विक्रेत्याच्या गोडाऊनमध्ये जात भाजीपाला खरेदी करत असल्याचे व्हिडीओ शुटींग करण्यात आले आहे. यामुळे भाजी विक्री करणाऱ्या व्यक्तीबरोबर पालिकेने जाहीर बंदी घातली असताना हा भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या संबंधितांवरही कारवाई करायला हवी अशी मागणी होत आहे.