गर्दी टाळण्यासाठी व्यापारी, नगरपंचायत, पोलिस प्रशासनाने घेतला निर्णय…
कणकवली, ता.२२: कणकवली शहरात मंगळवारच्या आठवडा बाजार दिवशी मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापारी, नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे आज हा निर्णय घेतला.
कणकवली बाजारपेठेत मंगळवारच्या आठवडा बाजार दिवशी मोठी गर्दी होते. पोलिस प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही व्यक्ती-व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर पाळले जात नाही. बाजारात येणार्या नागरिकांची गर्दी रोखण्यासाठी आज कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कटेकर, पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, नगरपंचायतीचे अधीक्षक किशोर धुमाळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर आदींची संयुक्त बैठक झाली. यात लॉक डाऊन संपेपर्यंत प्रत्येक मंगळवारी मेडिकल दुकाने वगळता इतर सर्वच दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.