मुख्यमंत्री सहायता निधी;आजी-माजी मुख्याध्यापकांनी उचलला खारीचा वाटा…
सिंधुदुर्गनगरी.ता,२३: कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर राज्य सरकारला आर्थिक ताकद देण्यासाठी सामाजिक बांधिलकी आणि समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आपले एक दिवसाचे वेतन देण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने करून पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केलेले होते.त्यानुसार जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी व काही माजी मुख्याध्यापकांनीही सदर आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे.आता पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने एकूण ६१५६७३₹ एवढा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिलेला आहे.यात काही माजी मुख्याध्यापक तसेच मराठी व इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपले योगदान दिले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ हा महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ या संघटनेशी संलग्न असून शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जोपासणारी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक मुख्याध्यापकांची एकमेव संघटना आहे.आतापर्यंत एकूण 180शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपले योगदान मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले असून उर्वरित मुख्याध्यापक आपले एक दिवसाचे वेतन वर्ग करतील असे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे व सचिव श्री.गुरुदास कुसगांवकर यांनी सांगितले.संघाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल व एकजुटीने सर्वांनी मिळून सहकार्य केल्या बद्दल सर्व मुख्याध्यापकांचे संघाच्या वतीने मन:पुर्वक आभार मानण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाने संकट प्रसंगी शासनाला आर्थिक मदत करून संपूर्ण राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.