विलगिकरण कक्षात रवानगी ; मालवण पोलिसांची कारवाई…
मालवण, ता. २३ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना गोवा-म्हापसा येथून पायी शहरातील मेढा कोथेवाडा येथे दाखल झालेल्या गणेश प्रभाकर परब वय-३८ या तरूणावर येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याची येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत काहीजण चोरट्या मार्गाने जिल्ह्यात दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वीही आंब्यांच्या गाड्यांमधून तसेच अन्य मार्गाने जिल्ह्यात तसेच तालुक्यात दाखल झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. या सर्वांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यातच गोवा-म्हापसा येथून २० तारखेला निघालेला गणेश प्रभाकर परब हा तरूण २२ तारखेला सकाळी शहरातील मेढा कोथेवाडा येथे दाखल झाला.
याची माहिती आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना मिळताच त्यांनी त्याचा शोध घेत आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना केल्या. मात्र त्याने सुरवातीस नकार दिला. याची माहिती पोलिसांना देताच पोलिस कर्मचारी कैलास ढोले, प्रसाद आचरेकर यांनी त्यांच्या घरी जात योग्य समज दिल्यानंतर त्याने आरोग्य तपासणी करून घेतली. त्यानंतर त्याची विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. जीवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविणे तसेच साथरोग प्रतिबंधक अधिनियमानुसार गणेश परब याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भारत फार्णे अधिक तपास करत आहेत.