महसूलची धडक कारवाई ; लॉकडाऊनमध्ये वाळू माफियांकडून अवैधरित्या वाळू उपसा…
मालवण, ता. २३ : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केले असून या काळात वाळू उपसा करण्यास बंदी आहे. मात्र सामाजीक अंतर ठेवण्याच्या नियमाला हरताळ फासत देवली वाघवणे खाडीपात्रात सध्या अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याची माहिती मिळताच तहसीलदार अजय पाटणे यांनी महसूलच्या पथकासह काल रात्री अचानक देवलीत धाड टाकत वाळू वाहतूक करणारा एक डंपर पकडला. या डंपरमध्ये दोन ब्रास वाळू मिळाली आहे. दंडात्मक कारवाईसाठी संबंधित मालकाला नोटीस बजावण्यात आला असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहे. सध्या वाळू उपशाला बंदी असतानाही वाळूमाफियांकडून अवैधरीत्या वाळूची चोरी सुरू आहे. तालुक्यातील देवली वाघवणे गावात गेले चार ते पाच दिवस रात्रीच्यावेळी अवैधरीत्या वाळूचा उपसा केला जात आहे. या प्रकाराची माहिती मिळताच तहसीलदार अजय पाटणे, मंडळ अधिकारी रवींद्र निपाणीकर, देवली तलाठी डी. व्ही. शिंगरे, डी. सी. ठाकूर, अंकुश शिंदे यांच्यासह पोलिस कर्मचार्यांच्या पथकाने रात्री देवली वाघवणे येथे अचानक धाड टाकली.
यावेळी वाळूची वाहतूक करणारा डंपर क्रमांक एम. एच. ०७ – सी- ६१६९ आढळून आला. या डंपरमध्ये दोन ब्रास वाळू सापडली. हा डंपर कुडाळ येथील महेश तुकाराम शिरसाट याच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली. डंपर जप्त करून तहसील कार्यालय परिसरात ठेवण्यात आला. संबंधित डंपर मालकास दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे.