ओरोस जिल्हा रुग्णालयात सुरू होते उपचार; दोन महिन्यापूर्वी घडला होता अपघात…
बांदा.ता,२३:
वाफोली-वझरीवाडी येथील पुजांगी विठ्ठल सावंत (वय २२) या युवतीचे ओरोस जिल्हा रुग्णालयात बुधवारी रात्री निधन झाले. गेल्या आठ दिवसांपासून तिला श्वसनाचा त्रास जाणवत होता.
जानेवारी महिन्यात पुजांगी आपल्या काकांकडे मुंबईत नोकरीसाठी गेली होती. मुंबईत ती आजीसोबत चालत असताना अज्ञात वाहनाने तिला ठोकरले होते. अपघातात लागलेल्या मुक्या माराचा तिला त्रास जाणवत होता. त्यामुळे उपचारासाठी मार्च महिन्यात ती गावी वाफोलिला आली होती.
आठ दिवसांपूर्वी तिला श्वास घेताना त्रास होत होता. रविवारी तिला धाप लागत असल्याने नातेवाईकांनी तिला उपचारासाठी खासगी डॉक्टरकडे नेले होते. सोमवारी पुन्हा त्रास होऊ लागल्याने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. तिची तब्बेत अधिकच बिघडल्याने प्रथम सावंतवाडीत उपजिल्हा रुग्णालय व त्यानंतर ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते.
पुजांगीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता. रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचा मेसेज करून तिने नातेवाईक आणि मैत्रिणींना कळविले होते. तिने कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असा व्हाट्सअप्प स्टेटस देखील ठेवला होता. मात्र बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तिचे उपचारादरम्यान निधन झाले. पुजांगीच्या निधनाने वाफोली गावावर शोककळा पसरली आहे. तिच्या मागे आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.