कीटकनाशक पिऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न; बांबुळी रुग्णालयात सुरू होते उपचार…
बांदा.ता,२४:
निगुडे-गावठणवाडी येथील सौ. सोनाली सिद्धीविनायक गावडे (वय ३३) या विवाहितेचा बांबोळी रुग्णालयात काल मध्यरात्री मृत्यू झाला. १९ एप्रिल रोजी त्यांनी काजू फवारणीचे किटकनाशक प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले होते. गेले पाच दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. . मात्र, त्यांची तब्येत उपचारांना साथ देत नव्हती. अखेर काल रात्री त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांनी किटकनाशक प्राशन का केले याचे कारण समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सासू असा परिवार आहे. सौ. सोनाली यांचे माहेर अणसूर पाल (ता. वेंगुर्ले) येथे असून माहेरची मंडळी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.