उदय सामंत;परशुराम उपरकर यांचे नाव न घेता टीका
ओरोस.ता.२४:
शिवसैनिकाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. जर त्यांना शिवसेने बाबत एवढीच आत्मीयता असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. आमचे सल्लागार म्हणून संदेश पारकर यांनी त्यांना शिवसेनेत प्रवेश द्यावा, अशी टिका मनसे नेते परशुराम उपरकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.
जिल्हा नियोजनच्या जुन्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, संदेश पारकर उपस्थित होते. आम्हाला सल्ला देणाऱ्या व्यक्तींनी किती मदत केली हे जाहिर करावे. शिवसेनेच्या माध्यमातून गोवा येथे अडकलेल्यां ८०० नागरिकांना किती मदत केली याची माहिती घ्या. त्याचे मी पालकमंत्री या नात्याने फोटो काढून प्रसिद्धि घेतली नाही. आमची बांधीलकी जनतेशी आहे. ऐरागैऱ्यांशी आम्हाला गरज नाही. कोरोना कालावधीत सर्वानी आपआपल्या परीने काम करावे. तुम्ही टिका केल्याने माझी जबाबदारी वाढते. आम्हाला सल्ला देण्यापूर्वी आपला पक्ष संभाळावा. सल्ला देणाऱ्यांचे नेते राज ठाकरे यांचे मी अभिनंदन करतो. ते या काळात मुख्यमंत्री यांच्या कामाचे कौतुक करीत आहेत. मात्र, येथील नेते कोणाच्या तरी सांगण्यावरुन पत्रकार परिषदा घेवून टिका करीत आहेत. मला अक्कल नाही किंवा आपल्यालाच फार अक्कल आहे, अशा आविर्भावात कोणी राहु नये, असेही यावेळी उपरकर यांना मंत्री सामंत यांनी सांगितले.