राजन तेली ः बँक निवडणूक असल्याने सतीश सावंतांचे राजकारण…
कणकवली, ता.24 ः सिंधुदुर्गात 226 विकास सोसायट्या आहेत. यातील 52 वगळता उर्वरित सोसायट्या तोट्यात आहेत. या तोट्यातील सोसायट्या 120 रूपये दराने काजू बी खरेदी करू शकत नाहीत. मात्र जिल्हा बँकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सतीश सावंत प्रत्येक तालुक्यात दौरे करत आहेत. शेतकर्यांना काजूला चांगला दर मिळेल असे सांगून शेतकर्यांची फसवणूक करत आहेत अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज केली.
तेली यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, राज्यातील आघाडी सरकारने चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी केली. या कर्जमाफीच्या कचाट्यात जिल्ह्यातील बहुतांश सोसायट्या अडकल्या असल्याने त्या तोट्यात आहेत. त्यामुळे तोट्यातील सोसायट्या जिल्हा बँकेकडून कर्ज घेऊन शेतकर्यांकडून काजू बी खरेदी करू शकत नाहीत. तसेच काजू बी खरेदी केल्यानंतर वजनात 6 ते 9 टक्के एवढी तूट येते. ही तूट सोसायट्या कशी काय भरून काढणार? त्यामुळे भूलथापा मारून जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी काज उत्पादन करणार्या शेतकर्यांची फसवणूक करू नये. तसा प्रकार झाल्यास आम्ही तो हाणून पाडणार आहोत.
तेली म्हणाले, पणन महामंडळ राज्यातील ऊस, द्राक्ष बागायतदारांना 6 टक्के दराने कर्जपुरवठा करते. त्याच धर्तीवर इथल्या काजू उत्पादकांना कर्जपुरवठा झाला तरच काजू बीला चांगला दर मिळू शकतो. याखेरीज राज्य शासनाने काजूसाठी 100 कोटींचे अनुदान दिले. तरच 120 रूपये प्रतिकिलो असा काजू दर निश्चित होऊ शकतो. राज्यात शिवसेनेचे सरकार आहे. त्यामुळे सतीश सावंत यांनी तसे प्रयत्न करावेत. पण चुकीच्या घोषणा करून शेतकर्यांची फसवणूक करू नये.