सतीश सावंत ; कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मार्केटींगची व्यवस्था निर्माण करणार…
मालवण, ता. २४ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना खत, बियाणे यांची टंचाई भासू नये यासाठी शेतकर्यांच्या दारात खत, बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या १५ मे पर्यंत खताचा पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबरच या हंगामात कलिंगड उत्पादकांना मोठा फटका बसल्याने अशा कलिंगड उत्पादक शेतकर्यांना एकत्रित करत सहकारी संस्थेच्या माध्यमातून मार्केटिंगची व्यवस्था निर्माण केली जाईल असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात तालुक्यातील विविध सहकारी सोसायट्यांचे चेअरमन, गट सचिवांची बैठक झाली. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष व्हिक्टर डांटस, आबा हडकर, देवानंद लोकेगावकर, कृषी अधिकारी संजय गोसावी, वसंत हडकर, दीपक चव्हाण, विश्वनाथ डोर्लेकर, दिनेश ढोलम यांच्यासह अन्य सोसायट्यांचे चेअरमन, गटसचिव उपस्थित होते.
श्री. सावंत म्हणाले, खरिपाचा आढावा घेत तालुक्यातील शेतकर्यांना खत, बियाणांची टंचाई भासू नये यासाठी शेतकर्यांना दारापर्यंत खत, बियाणे कसे उपलब्ध करून देता येईल याचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे जे संकट ओढवले आहे त्या काळात शेतकर्यांना खते, बियाणे वेळेत उपलब्ध न झाल्यास अनेक समस्या भेडसावणार आहेत. त्यामुळेच दारापर्यंत खते, बियाणे येत्या १५ मे पर्यंत कशी उपलब्ध करून देता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्ह्यात शेतकर्यांकडून ६० ते ६५ रुपयांना काजू बी खरेदी केली जात आहे. मात्र काजूगराचा दर कमी झालेला नाही. त्यामुळे शेतकर्यांनी कमी दराने काजू बीची विक्री करू नये. काजू उत्पादित शेतकरी टिकला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी शेतकर्यांमध्ये जागृती करावी. टीका टिप्पणी जरूर करा. पण काजू उत्पादकांना चांगला दर मिळवून देण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले.
ज्या काजू बी उत्पादक शेतकर्यांनी सन २०१९-२० या वर्षात काजू पीक कर्ज घेतले आहे. अशा शेतकर्यांना काजू बी कमी दराने न विकण्यासाठी २० टक्के जादा कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिवाय जे महिला बचतगट आहेत त्यांना नियमित व्याजदराने २० हजार रुपयांचे कर्ज दैनंदिन गरजांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. शेतकर्यांना अडचणी न येता त्यांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हा बँकेच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. या हंगामात कलिंगड उत्पादक शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे येत्या मे महिन्यात कलिंगड उत्पादक शेतकर्यांना एकत्रित आणून सहकारी संस्थांच्या माध्यमातून मार्केटिंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल असे श्री. सावंत यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत किसान क्रेडिट योजनेचा लाभ हा शेतकर्यांना दिला जात होता. मात्र या योजनेचा लाभ मच्छीमारांना मिळावा यासाठी बँक विचाराधीन होती. यासंदर्भात येत्या 5 मे रोजी जिल्हा बँकेच्या संचालकांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे अशी माहितीही श्री. सावंत यांनी यावेळी दिली.