संदेश पारकर ; भाजपच्या आमदार, नेत्यांची घरात बसून टीका
कणकवली, ता.२४: कोरोना संकटाचे आव्हान शिवसेनेची मंडळी जिवावर उदार होऊन यशस्वीपणे पेलत असल्याने भाजपचे आमदार, इतर नेते तसेच अन्य विरोधक मंडळी सैरभैर झाली आहेत. शिवसेना नेत्यांवर विनाकारण घरात बसून टीका करत असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते आणि कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी आज केली.
श्री.पारकर म्हणाले, कोरोनाच्या भीषण संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकार कौतुकास्पद कामगिरी करीत आहे. शिवसेनेचे स्थानिक आमदार, खासदार जिवावर उदार होऊन, प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत, काम करीत आहेत. भाजपचे स्थानिक आमदार आणि नेते मात्र नुसतीच टीका करून राजकारण करीत आहेत. चांगल्या कामाला चांगले म्हणायची दानत विरोधकांनी ठेवली पाहिजे, आणि अशा कठीण प्रसंगात तरी राजकारण करू नये.
ते म्हणाले, कोरोनाच्या प्रसारामुळे लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्योगधंदे बंद झाले. कामे ठप्प झाली. रोजगाराचे संकट निर्माण झाले. आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला. अशा परिस्थितीत लोकांना धीर देणे, सरकारी मदत योग्य लोकांपर्यंत पोहोचते आहे की नाही यावर लक्ष ठेवणे, प्रशासनाशी संवाद साधणे आणि रोगाचा प्रसार होऊ नये याची काळजी घेतानाच जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊ नये आणि स्वतःला कोणतीही आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक होते.
ही सारी आव्हाने शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी यशस्वीपणे पेलली आहेत. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक आणि सावंतवाडीचे आमदार माजी मंत्री दीपक केसरकर दिवसापासून तळागाळात संपर्क ठेऊन आहेत. हे सारेच लोकप्रतिनिधी जिवाची पर्वा न करता आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन प्रत्यक्ष फिल्डवर काम करीत आहेत. लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. अधिकार्यांशी चर्चा करीत आहेत. कार्यकर्त्यांना आदेश देत आहेत. हे काम खरेच कौतुकास्पद आहे. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव कुणालाही होऊ शकतो. हे सर्व लोकप्रतिनिधी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांना त्यांचे आयुष्य आणि कुटुंब आहेत. आपापल्या घरात बसून फेसबुकवर आढावा घेऊ शकले असते. किंवा स्थानिक कार्यकर्त्यांना कामाला लावून आपण नामानिराळे राहू शकले असते. मात्र अगदी सामान्य सैनिकासारखे ते तळागाळात कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. कुणालाही हेवा वाटावा असे लोकप्रतिनिधी आपल्याला शिवसेनेने दिले आहेत.
श्री.पारकर म्हणाले, शिवसेनेची नेतेमंडळी जीव धोक्यात घालून कोरोना परतवून लावत आहेत. त्याची कोणतीही दखल न घेता विरोधी मंडळी शिवसेनेवर टीका करायची एककलमी कार्यक्रम राबवत आहेत. उठसूट शिवसेनेच्या नेत्यांवर आणि लोकप्रतिनिधींवर टीका केली जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचा ठेका घेतल्याचा आव आणणारे यांचे नेते अजून घरात बसून आहेत. आपल्या बगलबच्च्यांना सांगून सोशल मीडियावर चिखल उडवण्याचे त्यांचे धोरण आहे.
ते म्हणाले, संकट मोठे आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. माणसे उभी करण्याची आणि जगवण्याची वेळ आहे. पण विरोधकांना स्थितीचे गांभीर्य आहे, असे दिसत नाही. या परिस्थितीत आम्हाला राजकारण करायचे नाही, आम्ही त्या मनस्थितीतही नाही. विरोधकांनी या वेळी उगाच वातावरण खराब करू नये. जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे. कोण काम करते आहे, आणि कोण उगाच राजकारणासाठी टीका करते आहे, हे जिल्ह्यातील जनतेला चांगलेच कळते. त्यामुळे स्वतः काही करायचे नाही आणि काम करणार्यांवर टीका करायची, अशा प्रवृत्तीला जनता माफ करणार नाही.