Monday, January 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याउपर्‍यांना, निष्ठावंत शिवसैनिकांची व्यथा काय समजणार...

उपर्‍यांना, निष्ठावंत शिवसैनिकांची व्यथा काय समजणार…

परशुराम उपरकर ; आम्ही तोंड उघडले तर तुमची पळताभूई होईल

कणकवली, ता. २४: पालकमंत्री उदय सामंत यांनी मला तोंड उघडायला लावू नये. मी बोललो तर तुमची पळताभुई थोडी होईल असा इशारा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज दिला. तसेच उपर्‍यांना, निष्ठावंत शिवसैनिकांच्या व्यथा काय समजणार असा टोलाही हाणला.
येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री उदय सामंत यांच्या विधानाचा समाचार घेतला. ‘शिवसेनेबाबत एवढीच आत्मियता असेल तर उपरकर यांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि आमचे सल्लागार व्हावे’ असे श्री.सामंत म्हणाले होते. त्याला श्री.उपरकर यांनी उत्तर दिले.
श्री.उपरकर म्हणाले, मी 1983 पासूनच बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. सन 2005 मध्ये काही मंडळी शिवसेना संपवायला निघाली होती. त्यावेळी भगवा हातात घेण्यासही काहींची हिंमत होत नव्हती. त्यावेळी निवडक कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्ष टिकवला आणि वाढवला. पण पक्षातील काही स्वार्थी नेत्यांमुळे मला शिवसेना पक्ष सोडावा लागला. मात्र आपण कधीही बाळासाहेब अथवा ठाकरे कुटुंबावर टीका केली नाही आणि करणारही नाही. मी मनसेत असलो तरी सिंधुदुर्गातील कट्टर शिवसैनिक आजही आपल्या व्यथा माझ्याकडे मांडतात. परंतु शिवसेनेत आलेल्या उपर्‍यांना शिवसैनिकांच्या व्यथा कधीच समजणार नाहीत.
श्री.उपरकर म्हणाले, शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी कुडाळ येथील एकावर पोलिसांकडून कारवाई होते. तशीच घटना कणकवलीत घडते. यात शिवसेनेला त्रास देणारी मंडळी सहभागी असून देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही. हीच निष्ठावंत शिवसैनिकांची खंत मी मांडली होती. मात्र यावर बोलण्याऐवजी पालकमंत्री उदय सामंत माझी कुंडली काढण्याची भाषा बोलत आहेत. पण मी तोंड उघडले तर तुमची पळताभुई थोडी होईल हे आधी लक्षात घ्यावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments