संशयितांना उद्या न्यायालयात हजर करणार ; वाळू चोरणाऱ्यांचे धाबे दणाणले…
मालवण, ता. २४ : चोरट्या वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. यात डंपरही जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वाळूची चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात वाळू उपसा करण्यास बंदी असतानाही देवली वाघवणे खाडीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याची माहिती मिळताच तहसीलदार अजय पाटणे यांनी महसूलच्या पथकासह दोन दिवसांपूर्वी देवलीत धाड टाकत वाळू वाहतूक करणारा एक डंपर पकडला. या डंपरमध्ये दोन ब्रास वाळू सापडून आली. दंडात्मक कारवाईसाठी संबंधित मालकाला नोटीस बजावण्यात आली होती.
यात चोरट्या वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी मंडळ अधिकारी रवींद्र निपाणीकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार डंपर मालक महेश तुकाराम शिरसाट रा. कुडाळ, डंपर चालक प्रभाकर लालू राठोड या दोघांवर चोरट्या वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. यात डंपर क्रमांक एम. एच. ०७ – सी- ६१६९ जप्त करण्यात आला आहे. या दोघांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण तपास करत आहेत.