मालवणी कविता जगवण्यासाठी अनोखा फंडा; फेसबुक’वर मिळताहेत शेकडो लाईक्स…
सावंतवाडी/अमोल टेंबकर.ता.२५: मालवणी भाषेबरोबर मालवणी कविता जगविण्याचा आयुष्यभर प्रयत्न करणार्या सावंतवाडीचे मालवणी कवी दादा मडकईकर यांना अनोख्या दिव्यातून जावे लागत आहे. मालवणी कविता अजरामर राहण्यासाठी आवश्यक असलेला रेकॉर्डींग स्टुडीओचा खर्च पेलवणारा नसल्यामुळे चक्क बाथरुम मध्ये राहून त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. विशेष म्हणजे या कविता त्यांनी फेसबूकवर टाकल्याअसून त्यांना शेकडो लाईक मिळत आहेत.
सावंतवाडी शहरात लहानाचे मोठे झालेले.श्री दादा मडकईकर हे आयुष्याच्या उत्तरार्धाकडे आले आहे. सदयस्थिती त्यांचे वय हे ७१ इतके आहे.त्यांनी गेल्या अनेक वर्षात मालवणी कविता व बोली भाषा जपण्याचा प्रयत्न केला.या माध्यमातून कोणत्याही फळाची कींवा पैशाची अपेक्षा न ठेवता, त्यांनी आपला वसा सुरू ठेवला. गेल्या काही वर्षात त्यांनी सुमारे दोन हजारहून अधिक छोटेमोठे कार्यक्रम केले.अखिल भारतीय साहीत्य संमेलन, कोकण मराठी साहीत्य संमेलनात सहभाग घेतला.विविध शाळांत,धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला,मात्र असा प्रकारचे कार्यक्रम करुन त्यांच्या कविता अजरामर राहणे शक्य नाही. हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी अनोखी युक्ती केली आहे. याची सुरवात त्यांनी लॉकडाउनच्या काळात केली.
आपल्या कविता अजरामर राहणे,हेच उद्दीष्ट असल्यामुळे कोणताही बडेजाव नसलेल्या,या मालवणी कवीने चक्क बाथरुम मध्ये राहून आपल्या कविता रेकॉर्ड केल्या आहेत.याबाबत श्री मडकईकर यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
ते म्हणाले मला कविता आणी मालवणी बोली भाषा जगवायची आहे.आता माझे वय ७१ आहे. त्यामुळे यापुढच्या पिढीला सुध्दा मालवणी भाषेची गोडी वाटावी,म्हणून हा माझा प्रयत्न आहे.यासाठी आवश्यक असलेल्या रेकॉर्डींग स्टुडीओसाठी आवश्यक असलेला खर्च मला परवडणारा नाही.त्यामुळे बाथरुम माझा स्टुडीओ बनला आहे.आणी याला माझ्या घरातील लोकांनी मला परवानगी दिली आहे. दादा यावेळी बोलताना भावूक झाले,मी गेली अनेक वर्षे हा तप सांभाळत आहे,अनेक कार्यक्रम केले.परंतू कोणाकडे पैशाची अपेक्षा केली नाही.उलट कोणी विचारल्यानंतर “काय दितात ता द्या”,असे सांगुन त्यांचा सन्मान राखला.यावेळी अनेकांनी माझ्याकडे आश्चर्य व्यक्त केले,मात्र मी कधी बडेजाव केला नाही,आणी टोळी सुध्दा केली नाही.त्यामुळे कोणत्याही संगीतांचे शिक्षण न घेता,अगदी राग सांगुन मी गाणे सादर करतो ही माझी दैवी देणगी आहे.असे त्यांनी सांगितले.ते म्हणाले,या सर्व प्रवासात मला अनेकांनी आश्वासने दिली.मालवणी भाषा जगविण्यासाठी असे केले पाहीजे, तसे केले पाहीजे,असे अनेकांचे म्हणणे आहे.परंतू प्रत्यक्षात मात्र म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही.त्यामुळे येणार्या काळात आपल्या हाताने होईल,तेवढे करावे,आणी ते ही कोणाच्या विरुध्द दुजाभाव व राग मनात न ठेवता आणी तशी मला देवाने संधी द्यावी आणी माझ्या मालवणी कविता कायम नव्या पिढीच्या तोंडावर रहाव्यात अशी आपली इच्छा आहे,असे त्यांनी सांगितले. त्याचे आबोलेचो वळेसार,चांदण्याची फुला कोकण हीरवेगार हे कविता संग्रह प्रसिध्द झाले आहे,तर मालवणी शब्द कोश सुध्दा आपण काढला आहे. काही दिवसापुर्वी स्वखर्चाने कवितांची सीडी आपण प्रकाशित केली होती,मात्र आता फेसबुकच्या माध्यमातून अनोखा प्रयोग आपण करीत आहे.मात्र बाथरुम मध्ये जरी आपण गाणे सादर केले तरी आपल्याला काही वेगळे वाटत नाही, काही जणांनी मला विचारले पण मी तितक्याच सोज्वळपणे उत्तर दिले असे मडकईकर म्हणाले.