सिधुदुर्गातील नवोदित कलाकारांची संकल्पना
वेंगुर्ला.ता.२४: सध्या समाजात कोरोना विषयी विविध पद्धतीने जनजागृती केली जात आहे. मात्र ‘‘पुनर्जन्म जगून पहा‘‘ या संकल्पनेच्या माध्यमातून एक वेगळा विचार समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न सिंधुदुर्गातील काही कलाकार मंडळींकडून करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी जनजागृती काव्य बनविले आहे.
‘‘पुनर्जन्म जगून पहा‘‘ यामधून प्रत्येकाला उद्देशून असा संदेश देण्यात आलेला आहे की, आतापर्यंत आपल्याला देशासाठी काहीतरी करुन दाखविण्याच्या संधीला आपण मुकलो असलो तरी आता मात्र ती संधी चालून आलेली आहे. त्यामुळे आपण स्वातंत्र्यलढ्यात नव्हतो याची खंत वाटून घ्यायची गरज नाही, शिवाजी महाराजांसोबत मावळा म्हणून संधी मिळाली नाही किंवा सीमेवर जाऊन लढता येत नाही या सर्व गोष्टींची खंत न बाळगता प्रत्येकाला संधी चालून आलेली आहे ती प्रत्येकाने आजमावून पहावी अशी विनंती समाजातील प्रत्येक व्यक्तीला या माध्यमातून करण्यात आलेली आहे.
ज्यांना संधी आहे की आपण देशासाठी काहीतरी करावे त्यांना ही संधी चालून आलेली आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातच थांबावे हीच देशाची खरी देशसेवा होईल अशी आगळीवेगळी संकल्पना या जनजागृती काव्याद्वारे करण्यात आलेली आहे. सदरचे जनजागृती काव्य सोशल मिडियाच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातच नव्हे तर सिंधुदुर्गाबाहेरून मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, गोवा येथून देखील अतिशय उत्तम प्रतिसाद त्यांच्या या काव्याला मिळाला असून या कलाकारांचे सुंदर संकल्पनेचे समाजातून कौतुक होत आहे. त्याचबरोबर यातून प्रत्येक व्यक्तीला एक स्वयंस्पूर्ती मिळून प्रत्येकजण आपल्या घरातच थांबेल व त्यातून आपल्या सर्वांचे व आपल्या देशाचे भले होईल अशी आशा या संपूर्ण टीमकडून व्यक्त केली जात आहे. सदरचे काव्य लेखन अजिंक्य जाधव (वैभववाडी), दिग्दर्शन अमर प्रभू (पाट), संकल्पना-संकलन निलेश गुरव, मिलिंद आडेलकर आणि किशोर नाईक (नेरुर) यांनी केले आहे.