सतीश सावंत यांचे प्रत्युत्तर; कमी दराने काजू विकला तर शेतकर्यांचे नुकसान
कणकवली, ता.२५: कोकण कृषी विद्यापिठानेच काजूचा उत्पादन खर्च 122.550 रूपये एवढा निश्चित केला आहे. त्यामुळे काजू उत्पादक शेतकर्यांना किमान 120 रूपये काजू दर मिळायलाच हवा. त्यासाठीच आम्ही जिल्हा बँक, सहकारी सोसायट्या आणि शेतकरी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. मात्र काजूगर खाण्यापुरतेच मर्यादीत असणारे राजन तेली आणि अतुल काळसेकर हे कमी दराने काजू विका असे सांगून शेतकर्यांचे नुकसान करत आहेत असे प्रत्युत्तर जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले.
श्री.सतीश सावंत यांनी येथील जिल्हा बँक कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी तेली आणि काळसेकर यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, जिल्हयातील काजू उत्पादक शेतकर्यांना चांगला दर मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. मात्र निवडणुका आणि राजकारण यातच गुंतलेले राजन तेली आणि अतुल काळसेकर यांना शेतकर्यांच्या हिताची काळजी नाही. काजू उत्पादक शेतकर्यांची काळजी असती तर ते कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्यांना चांगला दर देऊ शकले असते. वस्तुतः सत्तेत असताना या द्वयींनी अनेक आश्वासने दिली. पण गेल्या पाच वर्षात काहीही केले नाही. राजकारण करायचे असेल तर या दोघांनी मला जरूर विरोध करावा. पण शेतकर्यांच्या हिताच्या आड येऊ नये. आम्ही काजू उत्पादक शेतकरी, काजू खरेदी करणारे व्यापारी, प्रक्रीया उद्योजक यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती ही तेली आणि काळसेकर यांची आहे. ही समिती कार्यक्षम असती तर शेतकर्यांच्या काजूला चांगला दर मिळाला असता आणि आम्हाला यात लक्ष देण्याची गरज नव्हती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना या समितीचा काय फायदा होत आहे ते देखील या द्वयींनी सांगावे असेही श्री.सावंत म्हणाले.