मत्स्यदुष्काळामुळे घेतला निर्णय ; मत्स्यहंगाम पारंपरिक मच्छीमारांसाठी ठरला चिंताजनक…
मालवण, ता. २५ : मत्स्य हंगामाच्या सुरूवातीपासून अरबी समुद्रात सातत्याने निर्माण झालेली वादळे आणि त्यानंतर परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स तसेच एलईडी पर्ससीनची बेकायदेशीर मासेमारी यामुळे मत्स्य दुष्काळात होरपळलेल्या पारंपरिक गिलनेट प्रकारातील ‘न्हय’ व्यावसायिकांनी दीड महिनाअगोदरच आवराआवर सुरू केली आहे. मालवणसह जिल्ह्यात ठिकठिकाणी न्हय व्यावसायिक आपली जाळी उतरवून फायबर बल्याव किनाऱ्यावर घेत असल्याचे चित्र आहे.
यंदाचा मत्स्य हंगाम पारंपरिक रापण आणि गिलनेटधारक मच्छीमारांसाठी अतिशय चिंताजनक गेला आहे. मत्स्य हंगामाच्या सुरूवातीला वादळी वाऱ्यांनी जोर केला. अॉक्टोबरमध्ये ‘क्यार’ वादळामुळे अनेक मच्छीमारांचे नुकसान झाले. मासेमारीही ठप्प राहिली. त्यानंतर सुरू झालेल्या मत्स्य हंगामात ‘एलईडी पर्ससीनवाले आणि परराज्यातील हायस्पीडवाले तुपाशी अन् पारंपरिक उपाशी’ अशी स्थिती राहिली. विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पुढाऱ्यांनी दिलेली आश्वासने भूलथापाच ठरली. केंद्र व राज्यातील सरकारला एलईडी मासेमारीवरील बंदीची कडक अंमलबजावणी करता आली नाही. परिणामतः रापण व गिलनेटधारक पारंपरिक मच्छीमारांना मासे मिळायचे बंद झाले. त्यांचे मासेमारीचे दिवसही घटले.
मत्स्य दुष्काळामुळे एक प्रकारे अघोषित मासेमारी बंदी पारंपरिक मच्छीमारांवर ओढवली. दुसरीकडे एलईडी पर्ससीनवाल्यांची बेकायदेशीर मासेमारी मात्र सुरूच राहिली. त्याला वेसण घालण्यात शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी अपयशी ठरले. शासनाकडे मत्स्य दुष्काळाची मागणी वारंवार करूनदेखील मत्स्यदुष्काळ शासनाच्या लालफितीतील कारभारात अडकलाय. शासनाचा नाकर्तेपणा आणि मत्स्य दुष्काळाला कंटाळून गिलनेटधारक न्हय व्यावसायिकांनी मुदतपूर्वच आपला गाशा गुंडाळायला सुरवात केली आहे. न्हयवाले मच्छीमार पंधरा वावापासून ४५ वावापर्यंत मासेमारीस जातात. परंतु राज्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील शेकडो हायस्पीड ट्रॉलर्स दिवसरात्र अतिक्रमण करून स्थानिक न्हय व्यावसायिकांना हैराण करतात. त्यांची जाळीसुद्धा तोडून नेतात. यावर्षी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. यासंदर्भात पोलिसात तक्रारी दाखल झाल्या आहेत.
एलईडी पर्ससीनवाले न्हयवाल्यांचे प्रमुख कॕच असलेली सुरमई मोठ्या प्रमाणात पकडतात. त्यामुळे न्हयवाल्यांना इंधन खर्च सुटेल एवढेसुद्धा मासे मिळत नाहीत. या साऱ्याला कंटाळून न्हयवाल्या पारंपरिक मच्छीमारांनी मान्सूनच्या आगमनाच्या दीड महिने अगोदरच आवराआवर सुरू केली आहे.