रुग्णवाहिकेतून केला प्रवास; पुन्हा गोव्याकडे रवानगी…
बांदा ता.२५: पणजी (गोवा) येथून रुग्णवाहिकेतून लपून बांद्यात येणे परप्रांतीय युवकाला चांगलेच महागात पडले. बांदा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची पुन्हा गोव्यात रवानगी केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, परप्रांतीय युवक पणजी येथे अडकला होता. लॉकडाऊन मुळे वाहतूक व्यवस्था बंद असल्याने त्याला गावी जाता येत नव्हते. यासाठी त्याने शक्कल लढवत रुग्णवाहिकेतून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेना प्रवेश नसल्याने या रुग्णवाहिका महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे थांबतात.
काल सायंकाळी उशिरा हा युवक रुग्णवाहिकेतून पत्रादेवी येथे उतरला. तिथून त्याने सीमेवरून बांदा गाठले. रात्री उशिर झाल्याने तो राहण्यासाठी जागा शोधत होता. सदर युवक हा बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याची कल्पना बांदा पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. व समज देऊन पुन्हा गोव्यात रवाना केले.