हेमंत मराठे; ग्रामसडक रस्ते विकास संस्थेला निवेदन
सावंतवाडी, ता.२५: मळेवाड भटवाडी येथे मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण तसेच पूल असे काम मंजूर आहेत.लॉक डाऊन मुळे हे सर्व काम बंद अवस्थेत होते.मात्र,आता लॉकडाऊन बाबतच्या अटी शासनाने शिथिल केल्या असून पावसात न करता येणारी कामे,तसेच अशी कामे ज्यामुळे पावसात नागरिकांची गैरसोय होईल अशी कामे करण्याची मुभा कंत्राटदारांना दिली आहे.
मळेवाड भटवाडी येथील मळेवाड नदीपात्रावर पुलाचे बांधकाम करणे गरजेचे असून हे काम पूर्ण न झाल्यास पावसात शालेय मुले,शेतकरी,नोकरदार वर्ग व ग्रामस्थांचे मोठे हाल होणार आहेत.यामुळे या पुलाचे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामसडक रस्ते विकास संस्थेकडे निवेदन देऊन केली आहे. अन्यथा हे काम पूर्ण न झाल्यास पावसात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान,तसेच कोणताही अनुचित प्रकार घडून वित्त व जिवीतहानी झाल्यास त्याला सर्वस्वी आपण जबाबदार राहाल असाही इशारा सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी दिला आहे.