वाहतूक ठप्प ; सरंक्षक बंधारा बांधण्याची ग्रामस्थांची मागणी…
मालवण, ता. २५ : ऐतिहासिक भगवंतगड किल्ल्याकडे जाणारा चिंदर- भगवंतगड ते भगवंतगड तरी या रस्त्याला नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने जोरदार तडाखा दिल्याने सुमारे तीनशे मीटरचा रस्ता नदीने गिळंकृत केला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. या रस्त्याच्या कडेला असणारी माडाची झाडेही नदीच्या पाण्याने माऱ्याने जमीनदोस्त झाली असून यामुळे माड बागायतीलाही धोका निर्माण झाला आहे.
तालुक्यातील प्रसिद्ध अशा भगवंतगड किल्ल्याकडे जाणारा चिंदर भगवंतगड ते भगवंतगड तरी या रस्त्याला नदीच्या बाजूने संरक्षक बंधारा बांधण्यात यावा ही येथील ग्रामस्थांची गेली कित्येक वर्षांची मागणी होती. फेब्रुवारी महिन्यात या रस्त्याचा भाग नदीच्या प्रवाहाच्या माऱ्यामुळे कोसळला होता. याबाबत पतन विभागाचे लक्षही वेधण्यात आले होते. काल सायंकाळी चिंदर भगवंतगड रस्त्याला नदीच्या पाण्याने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे नदीच्या किनाऱ्यावर असणारी माडाची झाडे कोसळून नदीत पडली. नदीच्या प्रवाहाने रस्त्याचा सुमारे तीनशे मीटरचा भाग पोटात घेतल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. या रस्त्याची धूप थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. याठिकाणी संरक्षक बंधारा उभारावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.