शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे आवाहन…
मालवण, ता. २५ : किनारपट्टी भागात मासेमारी क्षेत्रात काम करणाऱ्या खलाशांना पाय सुजणे तसेच अन्य आजारांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोनाच्या महामारीचे सर्वत्र सावट असल्याने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्व नौकांच्या मालकांनी आपल्या नौकेवरील खलाशांची आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली आहे.
मासेमारी नौकांवर काम करणाऱ्या खलाशांना सध्या विविध आजारांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. यात दोन दिवसांपूर्वी एका खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. नौकांवर काम करणाऱ्या खलाशांना हात, पाय सुजणे, ताप येणे अशी लक्षणे दिसून येत असल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी किनारपट्टी भागात सर्व्हे करण्याच्या सूचना आरोग्य विभागास दिल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील मच्छीमारांनी सतर्कतेच्या दृष्टीकोनातून आपल्या नौकांवरील सर्व खलाशांची आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक बनले आहे. त्यानुसार नौका मालकांनी खलाशांची तत्काळ आरोग्य तपासणी करण्याची कार्यवाही करावी असे आवाहन श्री. खोबरेकर यांनी केली आहे.