रामदास आठवले; तर… कोट्यवधींच्या आनंदावर विरजण पडेल…
मुंबई ता.२६: कोरोनाला नष्ट करण्यासाठी लॉकडाऊन पाळणे आवश्यक आहे.लॉकडाऊनच्या काळात दारू ची दुकाने बंद असल्याने अनेकांचे दारूचे व्यसन सुटले आहे.”गावागावातील म्हणते पारू
लॉकडाऊनमुळे माझ्या नवऱ्याची सुटली आहे दारू”,त्यामुळे जर थोड्या महसुलासाठी लॉकडाऊनच्या काळात पुन्हा दारू ची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला तर कोट्यावधी लोकांच्या आनंदावर विरजण टाकणारा अन्यायकारक निर्णय असेल.त्यामुळे दारूची दुकाने लॉकडाऊनच्या काळात सुरू करू नयेत,अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
त्यासाठी श्री.आठवले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहेत.नुकतेच मनसे चे नेते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र लिहून लॉक डाऊनच्या काळात महसूलवाढीसाठी दारू ची दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे.त्या पार्श्वभूमीवर ना.रामदास आठवले यांनी लॉक डाऊन च्या काळात दारू ची दुकाने सुरू करण्यास तीव्र विरोध केला आहे.
लॉक डाऊन मध्ये दारू कुठेही मिळत नाही त्यामुळे अनेकांचे दारू चे व्यसन सुटले आहे. त्यामुळे ज्यांचे दारूचे व्यसन सुटले त्यांच्या कुटुंबात आनंद आहे. आता पुन्हा लॉक डाऊनमध्ये जर दारू ची दुकाने सुरू करण्याचा विचार राज्य शासनाने केला तर तो चूकिचा निर्णय ठरेल असे ना रामदास आठवले यांनी संगितले.