दुपारची घटना; ६० काजू कलमे जळून खाक,आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश…
बांदा ता.२६: रोणापाल-मळी क्षेत्रात आज दुपारी शॉर्टसर्किटमुळे काजू बागायतीला भीषण आग लागली. या आगीत तीन एकर क्षेत्रातील सुमारे ६० काजू कलमे जळून खाक झाली. सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांना माहिती देताच त्यांनी तातडीने अग्निशमन बंब पाठवून दिला. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
आग विझण्यासाठी सरपंच सुरेश गावडे, माजी सरपंच प्रकाश गावडे, दशरथ गावडे, दयासागर छात्रालयाचे व्यवस्थापक जीवबा वीर, सुशांत गावडे, सुदीन गावडे, बाबु कोळापटे, विठ्ठल कोळापटे, बाळू तोरसकर, तुषार देऊलकर, नंदू नेमण, नंदादिप नेमण यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले. बांदा वीजवितरणचे कनिष्ठ अभियंता अनिल यादव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बांदा पोलीस काँस्टेबल विजय जाधव व होमगार्ड विश्वजित भोगटे यांनीही घटनास्थळी भेट दिली. या आगीत शेतकरी प्रकाश गावडे व सुरेश गावडे यांचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी व महसुल विभागाचा पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा प्राप्त झालेला नाही. महावितरण विभागाने पंचनामा करुन नुकसानभरपाई अदा करावी अशी मागणी करण्यात आली. अभियंता अनिल यादव यांनी नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.