वैभववाडी,ता.२७: आचिर्णे येथील बाळकृष्ण सिदु काळे या गरजू वृद्ध शेतकऱ्याला महाराष्ट्र ऋणानुबंध सामाजिक संस्थेने मदतीचा हात दिला आहे. काळे कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य पुरवठा संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. यापुढील लाँकडाऊनच्या काळात या कुटुंबाच्या पाठीशी ऋणानुबंध कायम राहील. असे संस्थेचे प्रतिनिधी सचिन हुंबे यांनी सांगितले आहे.
बाळकृष्ण उर्फ भामू काळे हे गेली काही महिने लकवा आजाराने त्रस्त आहेत. तर त्यांची पत्नीही मूकबधिर आहे. आजारपणात कुटुंबाचा डोलारा चालविण्यासाठी त्यांची मोलमजुरीसाठी नेहमी धडपड होती. परंतु कोरोनामुळे सर्वत्र लाँकडाऊन असल्याने त्यांचे उदरनिर्वाहाचे गणित बिघडले. मात्र या गरजू कुटुंबाच्या पाठीशी ऋणानुबंध संस्था देवदूत बनून उभी राहिली आहे. काळे कुटुंबाकडे मदत सुपूर्द करते वेळी सचिन हुंबे, संतोष बोडके, प्रकाश शिंगाडे व वाघोबा झोरे आदी उपस्थित होते.
फोटो – आचिर्णे येथील काळे कुटुंबाकडे मदत सुफूर्द करताना ऋणानुबंध संस्थेचे प्रतिनिधी सचिन हुंबे, संतोष बोडके व इतर कार्यकर्ते.