उदय सामंत यांनी दिला शब्द ; विरोधकांनी राजकारण करू नये…
सिंधुदुर्गनगरी ता.२७: मुंबईत अडकलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील चाकरमान्यांना जिल्ह्यात आणण्याविषयी आमच्या मनात कोणतेही दुमत नाही,ते आपल्या गावाकडे येऊन सुरक्षित राहावे,ही आमची इच्छा आहे.मात्र केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य शासन काम करीत आहे.त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाचा याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यानंतर मी स्वतः पुढाकार घेऊन चाकरमान्यांना गावाकडे घेऊन येईन,असा शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिला.दरम्यान काहींकडून या विषयाचे राजकारण केले जात आहे.मात्र परिस्थिती गांभीर्याने घेऊन त्यांनी ते आजच थांबवावे,असे आवाहनही श्री.सामंत यांनी यावेळी केले.याबाबतची माहिती त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दिली.
यावेळी बोलताना श्री.सामंत म्हणाले,सिंधुदुर्ग रत्नागिरी मधील अनेक चाकरमानी मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी अडकले आहेत. दरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना जिल्ह्यात आपल्या गावाकडे येता येत नाही आहे. या काळात राजकारण करून काहींकडून त्यांना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र परिस्थितीचे भान ठेवून त्यांनी हा सर्व प्रकार थांबविला पाहिजे,चाकरमान्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.त्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहे.मात्र कोरोच्या काळात राज्य शासन हे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार चालत असल्यामुळे केंद्र शासन आणि राज्य शासनाची याविषयी सकारात्मक भूमिका जाहीर झाल्यानंतर मी स्वतः पुढाकार घेऊन सर्व चाकरमान्यांना आपल्या जिल्ह्यात घेऊन येईन, तोपर्यंत तुमची त्याठिकाणी अवहेलना होणार नाही,याकडेही आम्ही गांभीर्याने लक्ष देऊ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.