रुपेश राऊळ; कोल्हापूर-बेळगावातून वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा आंबोलीला धोका….
सावंतवाडी ता.२७: कोल्हापूर,बेळगाव,संकेश्वर आदी भागातून अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणारी वाहने सध्या आंबोली बाजारपेठेतील पोलीस चौकीवर तपासणीसाठी थांबवली जात आहेत.मात्र त्यात कोणी कोरोनाची लागण झालेला असल्यास त्याचा नाहक त्रास आंबोली वासीयांसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे.त्यामुळे ही पोलीस चौकी तात्पुरती आजरा फाटा येथे नेण्यात यावी,अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी मुळीक यांच्याकडे केली आहे.याबाबत त्यांनी आज श्री.मुळीक यांना निवेदन दिले आहे.
श्री.राऊळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे,कोरोना व्हायरसने संपुर्ण देशासह महाराष्ट्रातही थैमान घातले आहे.या व्हायरसमुळे अनेकांनी आपले जीवही गमावले आहेत.याचपार्श्वभुमीवर आपला सिंधुदूर्ग जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी अद्यापपर्यत जिल्हा प्रशासन यशस्वी ठरले आहे.दरम्यान याच काळात सावंतवाडी बाजारपेठेत येणारा भाजीपाला,फळे,धान्यसाठा,दुध आदी जीवनावश्यक वस्तू बेळगांव,संकेश्वर,कोल्हापूर सारख्या भागातून येत आहेत.मात्र याठिकाणी बऱ्याच प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.दरम्यान या भागातील वस्तूंची वाहतूक आंबोली मार्गे सावंतवाडीत होत आहे.या वाहतुकीच्या तपासणी साठी आंबोली बाजारपेठेतील चौकीवर वाहने थांबवली जातात.ही वाहतूक होताना त्यातूनच कोणी कोरोनाबाधित रुग्ण आढळला,तर कोरोनाचा फैलाव आंबोलीवासियांना तसेच आंबोली बाजारपेठेतील व्यापारी वर्गाला नक्कीच होऊ शकतो, आणि याचा परिणाम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यावर होऊ शकतो,त्यामुळे आंबोली बाजारपेठेतील तपासणीसाठी असलेली पोलिस चौकी तात्पुरती आजरा फाटा येथे नेण्यात यावी,तसेच त्या गाड्यांमधून येणाऱ्या व्यापाऱ्यांची नेहमी आरोग्य तपासणी करण्यात यावी, त्यांच्याकडून शासनाच्या नियमांचे पालन केले जात आहे का हे पाहावे,व रेड झोन मधून येणाऱ्यांची सुद्धा काळजीपूर्वक आरोग्य तपासणी व्हावी,अशी मागणी या निवेदनातून केली आहे.