Wednesday, January 15, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजमावबंदीचे नियम धाब्यावर बसून आमदार राणेंची चमकोगिरी...

जमावबंदीचे नियम धाब्यावर बसून आमदार राणेंची चमकोगिरी…

संदेश पारकर यांची टीका; आमदारांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे

कणकवली, ता.२७:  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी आरोग्य आणि पोलिस यंत्रणेला सहकार्य करून पालकमंत्री, खासदार तसेच शिवसेना आमदारांनी अविरत मेहनत घेतली. यातूनच आता सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीन झोनकडे वाटचाल होत आहे. ही बाब लक्षात येताच आमदार नीतेश राणे जमावबंदीचे नियम धाब्यावर बसून चमकोगिरी करत असल्याची टीका शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केली.
श्री.पारकर यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक उपस्थित होते. श्री.पारकर म्हणाले, सिंधुदुर्गात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्व शिवसेना नेते, पदाधिकारी जनतेसोबत राहिले. आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवली तसेच पोलिस यंत्रणेलाही सहकार्य करून सिंधुदुर्गात लॉकडाऊनचे काटेकोर पालन केले. या महिनाभराच्या कालावधीत गायब असलेले आमदार नीतेश राणे आता सिंधुदुर्गात आले आहेत. एवढेच नव्हे तर खारेपाटण, फोंडाघाट, तळेरे आदी बाजारपेठांमध्ये शंभरपेक्षा अधिक कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन फिरत आहेत. मात्र ही वेळ कार्यकर्त्यांसह फिरण्याची नाही याचे गांभीर्य आमदार नीतेश राणेंना राहिलेले नाही.
देशात कोरोनोची लढाई सुरू असताना जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रयत्नशील होते. यातून आंबा, काजू, मच्छीमार वाहतुकीचा प्रश्न असे अनेक प्रश्‍न टप्प्याटप्प्याने सोडविले. व्यापारी, रिक्षा, दशावतारी कलाकार, गणेशमुर्ती कलाकार अशा अनेकांच्या व्यवसायाबाबत चांगले निर्णय घेण्यात आले. केशरी कार्ड धारकांना धान्य वितरणाचा निर्णय झाला. शिवभोजन योजना सुरू झाली. याचबरोबर जिल्हा स्तरावर बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, आमदार वैभव नाईक, अतुल रावराणे व अन्य सामाजिक संघटनांनी विविध साहित्याचे वाटप केले. जिल्हा प्रशासनाने चांगले काम केल्याने ऑरेंजमधून ग्रीन झोनमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा येण्याचा मार्ग सुकर झाला. या कालावधीत नीतेश राणे कुठे होते असाही प्रश्‍न श्री.पारकर यांनी केला. तसेच कणकवली मतदारसंघात कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतरच्या काळात आमदारांनी कणकवली मतदारसंघाला वार्‍यावर सोडले अशीही टीका श्री.पारकर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments