भिरवंडे गावातील घटना; हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल
कणकवली, ता. २७: जंगलात शिकारीसाठी गेलेल्या आठ जणांना आज कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. भिरवंडे गावातील मुरवडे येथील जंगलमय भागात हे सर्वजण शिकारीसाठी गेले होते. या सर्वांना बंदूकीसह ताब्यात घेऊन त्यांच्यावर हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये भिरवंडे येथील अरविंद महादेव सावंत (वय 65), भद्रीनाथ गणपत सावंत (वय 56), पुरूषोत्तम वसंत सावंत (वय 56), दत्तात्रय सदानंद सावंत (वय 54), दिगंबर सावंत (वय 48), जगदीश सावंत (वय 55), रविंद्र टिळवे (वय 54) आणि आनंद सावंत (वय 50) यांचा समावेश आहे. तसेच यांच्याकडून दोन बंदुका आणि चार काडतूसेही जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात संचारबंदी सुरू असतानाही बेकायदेशीरपणे ही सर्व मंडळी शिकारीला गेल्याचे पोलिसांना समजले होते. त्यामुळे या सर्वांना जंगलमय भागातून गुन्हा अन्वेषण पथकाने ताब्यात घेतले. तसेच त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.