मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निर्देश; ३ कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर निर्णय…
मुंबई ता.२८: कोरोना व्हायरसशी फ्रण्ट लाईनवर लढणाऱ्या पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.पोलीस दलात ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना घरात थांबण्याची सूचना देण्यात आली आहे.ज्या कर्मचाऱ्यांचं वय ५५ वर्षांपेक्षा जास्त आहे,त्यांनी बंदोबस्तात सहभागी होऊ नये,असं मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24X7 ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.गेल्या तीन दिवसात मुंबई पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते.त्यानंतर पोलीस आयुक्तांनी तातडीने पावलं उचलत ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना घरातच थांबण्याचे निर्देश दिले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे जे पोलीस कर्मचारी कोरोनामुळे दगावले त्यांचं वय ५० वर्षांपेक्षा जास्त होतं.त्यामुळे पोलीस कर्मचारी पर्यायाने त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयुक्त परमबीर सिंह यांनी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.