परिमल नाईक; ८४ हॉस्पिटलसह ६५० खाजगी डॉक्टर देताहेत सेवा….
सावंतवाडी,ता.२८: कोरोनाच्या काळात सावंतवाडी शहरात आरोग्य सेवा देण्यासाठी शहरातील सर्व डॉक्टर व हॉस्पिटल कार्यरत आहेत, आम्ही नक्कीच रूग्ण आणि लोकांसोबत राहू, असे आश्वासन सावंतवाडी मेडीकल संघटनेचे अध्यक्ष डाॅ. राजेश नवांगुळ यांनी आज येथे दिले. तर जिल्ह्यात तब्बल ८४ हॉस्पिटल आणि ६५० खाजगी डॉक्टर सेवा बजावत असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडुन सांगण्यात आले. सावंतवाडी शहरात कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात शासकीय यंत्रणेवर ताण पडू नये, यासाठी स्थानिक खाजगी डॉक्टरांनी “नाॅन कोरोना” रूग्ण तपासावेत, अशा सूचना नितेश राणे यांनी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष संजू परब आणि पालिकेचे आरोग्य सभापती परिमल नाईक यांनी त्यांच्याशी चर्चा केली, यावेळी त्यांनी माहिती दिल्याचे श्री नाईक यांनी सांगितले.
आमदार राणे यांनी नुकताच सावंतवाडीचा दौरा केला होता.यावेळी पत्रकारांशी बोलताना जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय अधिकारी जिल्हा आरोग्य प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी ताप, सर्दी, खोकला असे रुग्ण तपासावे, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर ही चर्चा करण्यात आली. यावेळी श्री नाईक म्हणाले, जिल्हा शल्य चिकित्सकांशी आपण चर्चा केली. सदयस्थितीत जिल्ह्यात तब्बल ८४ हॉस्पिटल आणि ६५० खाजगी डॉक्टर सेवा बजावत असल्याचे सांगण्यात आले, असे नाईक यांनी सांगितले.