सागर नाणोसकर; जीवाशी खेळ नको,जहाज माघारी पाठविण्याची मागणी…
सावंतवाडी/अमोल टेंबकर ता.२८: कोरोना सारख्या काळात जीवन मरणाची कसरत असताना पुन्हा एकदा मायनिंग वाहतूक करण्यासाठी परदेशी जहाज रेडी समुद्रात दाखल झाल्याने चर्चेला उधाण आहे.याबाबत ग्रामस्थ आक्रमक आहेत.दरम्यान शिवसेनेचे उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी आक्रमक भूमिका घेतली असून या प्रकारात जिल्हा प्रशासनाची भूमिका काय ?,असा सवाल करून ते जहाज परत पाठवा लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत असल्यास आम्ही गप्प बसणार नाही,असा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबतची माहिती नाणोसकर यांनी दिली. ते म्हणाले, एकीकडे जगात, देशात, राज्यात कोरोना आजाराने थैमान घातले आहे.अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत.अशा परिस्थितीत मायनिंग नेण्यासाठी एक परदेशी जहाज सद्यस्थितीत रेडी समुद्रात नांगरून ठेवण्यात आलेले आहे.दोन दिवसांपूर्वी हे जहाज आल्याचे समजते.याबाबत संबंधित विभागाकडून व मायनिंग कंपन्यांकडून गुप्तता पाळण्यात आलेले आहे.परंतु या सर्व प्रकारानंतर ग्रामस्थ कमालीचे नाराजी आहे.एकीकडे आजाराच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरापूर्वी आलेले जहाज परत पाठवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता.त्यासाठी येथील ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका घेतली,परंतु कोरोनाचे संकट अद्यापपर्यंत टळलेले नसताना पुन्हा एकदा परदेशी जहाज या ठिकाणी आले आणि या मागचे कारण काय तसेच या जहाजावर असलेले कर्मचारी हे अन्य ठिकाणाहून आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा संसर्ग येथील स्थानिक लोकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे लोकांची मागणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने हे जहाज तात्काळ माघारी पाठवावे,अन्यथा आम्ही शिवसेनेच्या वतीने आंदोलन करू, असा इशारा नाणोसकर यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले ,पैशाच्या हव्यासापोटी काही लोक आजाराच्या काळात अशाप्रकारे दुर्लक्ष करत असतील तर ते योग्य नाही.काही झाले तरी लोकांच्या जीवाशी कोणाला खेळू देणार नाही,प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे.