Monday, January 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याफेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल...

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल…

हॉस्पिटल, रिसर्च सेंटरची बदनामी, डॉक्टर, स्टाफच्या जीवितास धोका ; डॉ. रेडकर यांनी दिली पोलिसांत फिर्याद…

मालवण, ता. २८ : फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करून रेडकर हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरची बदनामी करण्याबरोबरच चिथावणीखोर वक्तव्यामुळे आपल्या व हॉस्पिटल स्टाफच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार डॉ. विवेक रेडकर यांनी मालवण पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार इपिडेमिक डिसिजेस (अपेंडमेंड) २०२० चे कलम ३ (२), आयटी कायदा तसेच अन्य कलमान्वये चार जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. रेडकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १६ एप्रिलला सकाळी अकरा वाजता मनोज खोबरेकर हे आई कै. आशालता वय-७५ यांना चार ते पाच दिवस छातीत दुखत असल्याने रात्री दोन वाजता हॉस्पीटलमध्ये तपासणीसाठी घेऊन आले. त्यांना दम्याचा त्रास होता. प्राथमिक तपासणी करून ई. सी. जी काढल्यावर त्यांना तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले. त्यावेळी त्यांच्या हृदयाचे ठोके अनियमित व रक्तदाब कमी झाला होता. आम्ही खोबरेकर यांना आईस हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना आयसीयू मध्ये ठेवावे लागेल याची कल्पना दिली. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सहा तासात रक्तातील गुठळी विरघळण्यासाठी दिले जाणारे इंजेक्शन मुळातच रुग्ण उशिरा आल्याने ते देऊन उपयोग होणार नाही याचीही कल्पना देण्यात आली. उपचारादरम्यान त्यांच्या आईला म्हातारपणीचा जुना दमा असल्याने व हृदय फुफ्फुसांना रक्तपुरवठा करत नसल्याने कंजेस्टीव्ह हार्ट फेल्युअर म्हणजेच फुफ्फुसात पाणी साठून प्रचंड धाप लागण्यास सुरू झाल्याने कृत्रिम श्‍वसन यंत्रणेवर ठेवावे लागेल याची खोबरेकर व त्यांच्या कुटुंबीयांना कल्पना दिली. त्यानंतर खोबरेकर यांनी आम्हाला तुमच्याच हॉस्पीटलमध्ये उपचार करायचे असल्याचे सांगितल्यानेच आईवर उपचार सुरू ठेवले. असे असताना २२ एप्रिलला खोबरेकर यांनी आयसीयुमध्ये आईला ठेवल्याने कफ होत असल्याचे न पटणारे कारण सांगत तिला घरी घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यावर डॉ. दर्शन खानोलकर यांनी कृत्रिम श्‍वसन यंत्राशिवाय आईला आवश्यक ऑक्सीजनच्या पुरवठ्याअभावी जिवंत राणे अशक्य असल्याचे समजावून सांगितले. मात्र त्यानंतरही खोबरेकर यांनी स्वतःच्या मर्जीने व हट्टाने आईला घरी नेण्याचे ठरविले. मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही आवश्यक ती कार्यवाही करून रुग्णाला घरी पाठविले. डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध खोबरेकर यांनी स्वतःच्या जबाबदारीवर आईला घरी घेऊन जात असल्याचे डॉ. खानोलकर यांच्या समक्ष लेखी लिहून घेण्यात आले आहे. असे असताना मी व माझ्या हॉस्पिटलच्या स्टाफकडून खोबरेकर यांच्या आईच्या वैद्यकीय उपचारामध्ये कोणताही दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा केलेला नसतानाही खोबरेकर यांनी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली आहे.
खोबरेकर यांनी फेसबुकवर केलेली आक्षेपार्ह पोस्ट हटविण्याची विनंती केल्यानंतरही त्यांनी उद्धट उत्तरे दिली. या पोस्टवर १२३ लोक व्यक्त झाल्याचे त्यात ८७ अभिप्राय असल्याचे तसेच २१ लोकांनी ती पोस्ट शेअर केल्याचे दिसून आले. हे कृत्य कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिवावर उदार होऊन प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा देणार्‍या आपल्यासारख्या वैद्यकीय व्यावसायिकाचे मनोधैर्य खच्चीकरण करणारे व मानसिक छळ करणारे आहे. पोस्टमधील भाषा व पूर्व इतिहास पाहिला असता हे कृत्य जीवे मारण्याची धमकी आहे. खोबरेकर यांच्या पोस्टवर दिलीप घारे, रवींद्र खानविलकर, प्रदीप गावकर यांनी दिलेले अभिप्राय हे डॉक्टरांच्या हिंसेला समर्थन देणारे आहे. पोलिसांत तक्रार देण्याची माहिती मिळाल्यावर मनोज खोबरेकर यांनी फेसबुकवरील पोस्ट डिलीट केली आहे. या कृत्यामुळे त्यांच्यापासून मला व हॉस्पिटलच्या स्टाफच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. एवढीवर्षे चांगली रुग्णसेवा करून मिळविलेला नावलौकिक व पत धुळीस मिळविली असून समाजातील प्रतिमा डागाळण्याचे काम केले आहे असे तक्रारीत डॉ. रेडकर यांनी म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी मनोज खोबरेकर, दिलीप घारे, रवींद्र खानविलकर, प्रदीप गावकर या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments